अकोला - देशातील बाजारामध्ये तुरीची मागणी असली तरी पुरवठा नसल्यामुळे दालमिल व्यावसायिकांची अडचण झाली आहे. अकोला औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात असलेल्या 80 टक्के दालमिल तूर नसल्यामुळे बंद पडण्याच्या स्थितीवर आहेत. शेतकऱ्यांकडे तूर नसल्याने ही भाववाढ त्यांच्यासाठी फायदेशीर नाही, अशी माहिती दालमिल असोसिएशनचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रुपेश राठी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
सध्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे तूर नसल्याने डाळीचे भाव सर्वसामान्यांच्या आटोक्याच्या बाहेर जात आहेत. डाळीला बाजारात प्रति किलो 120 ते 125 रुपये प्रति किलो दर आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात हेच भाव दोनशे रुपये प्रति किलो जाण्याची शक्यता रुपेश राठी यांनी व्यक्त केली आहे.
नाफेडकडे तुरीचा साडेतीन लाख टन एवढा साठा आहे. तसेच नाफेडकडे आयात कोटाही नाही. सध्या मागणी असली तरी पुरवठा होत नसल्याने देशातील दालमिल व्यावसायिक यांचे मोठे नुकसान होत आहे. तुरीचे भाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कडाडले असले तरी विक्रीसाठी तूर येत नाही. त्यामुळे ही भाववाढ शेतकऱ्यांच्या फायद्याची नाही. शेतकऱ्यांकडे तुरच नाही. नवीन तूर यायला डिसेंबरचा शेवटचा आठवडा असल्याचे राठी यांनी सांगितले. आतापासून डिसेंबरपर्यंत काळ धरला तर जवळपास 50 दिवस दालमिल व्यावसायिकांकडे काम राहणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी नाफेडकडे साठवून ठेवलेली साडेतीन लाख टन तूर विक्रीस काढणे गरजेचे आहे. हे दालमिल व्यवसायिकांसाठीच तसेच सर्वांसाठी फायद्याचे राहणार असल्याचा राठी यांनी दावा केला.
सध्या दालमिल व्यावसायिक या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. व्यवहार करताना दालमिल व्यावसायिक काळजी घेत असल्याचे दालमिल असोसिएशनचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रुपेश राठी यांनी सांगितले.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एस. एस. मालोकार म्हणाले, की तुरीचा बाजारात पुरवठा कमी असल्याने भाववाढ झाली होती. मात्र, मागणी कमी झाल्याने पुन्हा दर कमी झाले आहेत. सध्या बाजारात तुरीच्या भावात चढ-उतार सुरू असल्याचेही मालोकार यांनी सांगितले.