नवी दिल्ली - टाटा मोटर्सने अल्ट्रोजचे नवे मॉडेल प्रिमियम हॅचबॅक लाँच केले आहे. एक्सएम + व्हेरियंट नावाच्या या मॉडेलची किंमत ६.६ लाख रुपये (एक्स शोरुम दिल्ली) आहे.
पेट्रोलवर चालणाऱ्या अल्ट्रोज प्रिमियम हॅचबॅकमध्ये विविध नवीन वैशिष्ट्ये पहायला मिळणार आहेत. अॅपल कारप्लेचे टचस्क्रीन इनफोटेनमेंट आणि अँडाईड ऑटो आहे. त्यामुळे वाहन चालविण्याचा अद्वितीय अनुभव मिळू शकणार असल्याचे टाटा मोटर्सने म्हटले आहे. या कारमध्ये व्हाईस अलर्ट व आवाज ओळखणारी यंत्रणा आदी सुविधा दिलेल्या आहेत.
अल्ट्रोजने केवळ प्रिमीयम हॅचबॅक श्रेणीत नव्या वाहनांची भर पडणार नाही. तर उद्योगामध्ये सुरक्षेचे नवा मापदंड तयार केल्याचे टाटा मोटर्सचे विपणन प्रमुख विवेक श्रीवास्तव यांनी सांगितले. एक्सएम + व्हेरियंटच्या लाँचिंगने अल्ट्रोजच्या ग्राहकांना आकर्षक किमतीत नवा पर्याय मिळणार असल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले.
दरम्यान, अल्ट्रोज ही जानेवारी २०२० मध्ये ५ स्टार ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅमसह लाँच झाली होती. कोरोना महामारी आणि टाळेबंदीच्या फटक्यातून वाहन उद्योग सावरत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून वाहन खरेदीचे प्रमाण वाढले, अशी वाहन उत्पादकांना अपेक्षा आहे.