मुंबई - शेअर बाजार निर्देशांक २८५ अंशाने घसरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने मुंबई शेअर बाजार निर्देशांक घसरला आहे. तर एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसच्या डेरिटिव्हजची (शेअरची मुदत) संपत आहे. त्यामुळेही मुंबई शेअर बाजारात घसरण झाली आहे. सोन्याचा दर प्रति तोळा ४०० रुपयांनी वधारून ४१,५२४ रुपये झाला आहे.
मुंबई शेअर बाजार २८४.८४ अंशाने घसरून ४०,९१३.८२ वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक हा ९३.७० अंशाने घसरून १२,०३५.८० वर स्थिरावला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वाधिक २.६२ टक्क्यांनी शेअर घसरले. तर त्यापाठोपाठ नेस्ले इंडिया, इंडुसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एम अँड एम आणि एसबीआयचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे बजाज ऑटो, पॉवरग्रीड, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, एनटीपीसी, एचडीएफसी, एल अँड टी आणि मारुतीचे शेअर वधारले.
बाजार विश्लेषकांच्या माहितीनुसार फ्युचर अँड ऑप्शनच्या शेअरची जानेवारी मुदत संपत आहे. त्यामुळे शेअर बाजार अत्यंत अस्थिर राहिला आहे. दुपारच्या सत्रानंतर मोठे भांडवले मूल्य असलेल्या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांकात सतत घसरण सुरू राहिली आहे. अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणुकदारांनी सावधगिरीचा पवित्रा घेतल्याचाही परिणाम झाल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
सोने महागले!
सोन्याच्या किमती नवी दिल्लीत प्रति तोळा ४०० रुपयांनी वधारून ४१,५२४ रुपये झाल्या आहेत. लग्नसराई निमित्ताने वाढलेली मागणी, आणि जागतिक बाजारात सोन्याचे वधारलेले दर यामुळे किमती वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
चांदीच्या किमती प्रति किलो ७३७ रुपयांनी वधारून ४७,३९२ रुपये झाल्या आहेत. चांदीची किमत बुधवारी प्रति किलो ४६,६५५ रुपये होती.