मुंबई - जागतिक आर्थिक मंचावरील प्रतिकूल स्थिती आणि काश्मीर मुद्द्यावरून असलेल्या राजकीय अनिश्चितेचे शेअर बाजारात पडसाद उमटले आहेत. निर्देशांक ४१८ अंशाने घसरून शेअर बाजार बंद झाला.
शेअर बाजारात बँकिंग, वित्तीय आणि धातू कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाली आहे. निर्देशांकात १३४. ७५ अंशाची घसरण होवून निफ्टीचा निर्देशांक १०,८६२.६० वर पोहोचला.
राजकीय अनिश्चितता -
केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरला लागू असलेला ३७० कलम काढून टाकण्याचा निर्णय घेतला. तसेच जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर केला आहे. या निर्णयाला काँग्रेसह इतर विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे.
जागतिक आर्थिक मंचावर अशी आहे स्थिती-
डॉलरच्या तुलनेत ९० पैशांनी घसरण होवून आज दुपारनंतर रुपया ७०.५० वर पोहोचला. तसेच चीनचे युआन हे चलन हे डॉलरच्या तुलनेत ७.०३ ने घसरले आहे. निर्यात वाढविण्यासाठी चीनने युआनचे अवमूल्यन करण्याचा निर्णय घेतला आहे.