मुंबई - जागतिक शेअर बाजारात बँक, आयटी आणि ऑटो क्षेत्रांच्या समभागांमध्ये घसघशीत वाढ झाल्याने, इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स मंगळवारी पहिल्याच सत्रात 1,300 अंकांनी वधारला. या मोठ्या वाढीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 28,963.25 अंशांवर जाऊन पोहचला. त्याबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही 347.95 अंशानी वधारल्याने निफ्टी 8,431.57 अंशावर जाऊन पोहचला.
सेन्सेक्समध्ये 4.09 तर निफ्टीमध्ये 4.30 टक्के वाढीची नोंद झाली. सेन्सेक्समध्ये इंडुसइंड बँकेची 15 टक्के वाढ अव्वल स्थानी राहिली. महिंद्रा आणि महिंद्रा, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि इन्फोसिस यांचे शेअर्सही आघाडीवर राहिले. बजाज फायनान्सचे मात्र शेअर घसरले.
सोमवारी महावीर जयंतीच्या दिवशी बाजार बंद होता. देशातील कोरोना विषाणू वाढत्या रुग्णांमुळे चिंता असूनही जागतिक समभागांबरोबर देशांतर्गत समभागांमध्ये सकारात्मक चित्र दिसून आले. शांघाय, हाँगकाँग, टोकियो आणि सियोलमधील शेअर बाजारांमध्ये 2 टक्क्यांची वाढ झाली आहे.