मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर स्थिर ठेवल्याचा शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला. मुंबई शेअर बाजार निर्देशांक हा ३२६.८२ अंशाने वधारून ४०,५०९.४९ वर स्थिरावला. सलग सातव्या सत्रात मुंबई शेअर बाजारात वित्तीय संस्थांचे शेअर वधारले आहेत.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केले. माध्यमांशी बोलताना दास यांनी येत्या जानेवारी ते मार्चच्या तिमाहीत विकासदर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेअर बाजारात उत्साह निर्माण झाल्याचे ट्रेडर्सने सांगितले.
मुंबई शेअर बाजार ३२६.८२ अंशाने वधारून ४०,५०९.४९ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ७९.६० अंशाने वधारून ११,९१४.२० वर स्थिरावला. शेअर बाजार बंद होताना बीएसई आणि वित्तीय कंपन्यांचे शेअर २.६४ टक्क्यांनी वधारले. तर रिअल्टी आणि वाहन कंपन्यांचे शेअर घसरले आहेत.
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
आयसीआयसीआय बँकेचे सर्वाधिक सुमारे ३ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ अॅक्सिस बँक, एचडीएफसी ट्विन्स, एसबीआय, एल अँड टी, ओएनजीसी आणि इन्फोसिसचे शेअर वधारले. तर सन फार्मा, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचयूएलचे शेअर घसरले आहेत.
सॅमको ग्रुपचे संस्थापक जिमित मोदी म्हणाले, की पतधोरण हे अपेक्षेप्रमाणे आहे. मात्र, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जीडीपीबाबत केलेले विधान खूप चांगले आहे. चलनाची तरलता वाढविण्यासाठी आरबीआयच्या घोषणांनी दलाल स्ट्रीटवर उत्साह वाढल्याचेही मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढून प्रति बॅरल ४२.९७ डॉलर आहे. तर फॉरेक्स मार्केटमध्ये रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ८ पैशांनी वाढून ७३.१५ वर पोहोचले आहे