मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक ५४० अंशाने घसरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअरच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५४० अंशाने घसरून ४०,१४५.५० वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक हा १६२.६० अंशाने घसरून ११,७६७.४५ वर स्थिरावला.
या कंपन्यांच्या शेअरमध्ये झाली घसरण-
बजाज ऑटोचे शेअरचे दर सुमारे ६ टक्क्यांनी घसरले. त्यापाठोपाठ एम अँड एम, रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल), टाटा स्टील, टेक महिंद्रा, एसबीआय, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर घसरले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर सुमारे ४ टक्क्यांनी घसरले.
सिंगापूरमधील लवादाच्या निकालाने रिलायन्सला फटका-
अॅमेझॉनने रिलायन्स रिटेल आणि फ्युचअरमधील २४ हजार ७१३ कोटींच्या सौद्याला आक्षेप घेत सिंगापूरमधील लवादाकडे तक्रार दाखल केली होती. या लवादाने रिलायन्स आणि फ्युचअरमधील सौद्याला स्थगिती दिली आहे. त्याचा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरवर परिणाम झाला. नेस्ले इंडिया, कोटक बँक, इंडसइंड बँक, पॉवरग्रीड आणि एचयूएल कंपनीचे शेअर वधारले.
शेअर बाजारात दुपारनंतर धातू, वाहन, स्थावर मालमत्ता आणि वित्तीय संस्थाच्या शेअरची जोरदार विक्री झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरलने २.०४ टक्क्यांनी घसरून ४१.१४ डॉलरवर आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत २३ पैशांनी घसरले. त्यामुळे एका डॉलरसाठी ७३.८४ रुपये असा विनिमय दर आहे.