मुंबई - चीन आणि अमेरिकेतील व्यापारी युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेली नऊ सत्रे शेअर बाजारचा निर्देशांक घसरत आहे. शेअर बाजाराच्या सकाळच्या सत्रात आज ६१.८८ अंशांनी घसरण होवून तो ३७,०२८ अंशांवर पोहोचला. निफ्टीच्या निर्देशांकात १८.४५ अंशाची घसरण होवून तो ११,१२९.७५ अंशावर पोहोचला आहे.
शेअर बाजारच्या नऊ सत्रांत एकूण १ हजार ९४०.७३ अंशाची घसरण झाली आहे. तर निफ्टीच्या निर्देशांकात नऊ सत्रांत एकूण ६०० अंशाची घसरण झाली.
या कंपन्यांच्या शेअर्सच्या दरात झाले चढ-उतार -
सकाळच्या सत्रात वेदांत, सन फार्मा, आरआयएल, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, इंडुसलंड बँक, आयटीसी, भारती एअरटेल आणि पॉवरग्रिड कंपन्यांच्या शेअर २.८५ टक्क्यापर्यंत वधारले. तर बजाजा ऑटो, एशियन पेंट्स, टाटा स्टील, ओएनजीसी, इन्फोसिस, एचसीएल टेक, एचडीएफसी, कोल इंडिया, येस बँक, टीसीएस, बजाज फायनान्स, एनटीपीसी, अॅक्सिक बँक यांच्या शेअरची १.७४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
यामुळे शेअर बाजारात होत आहे घसरण-
अमेरिका-चीनमधील व्यापारी युद्धानंतर जागाच्या आर्थिक मंचावर अस्थिरता निर्माण झाली आहे. तसेच विदेशी संस्थांनी भांडवली बाजारातून काढलेला निधी यामुळे गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.
आयएल अँड एफ एसने ९० हजार कोटींहून अधिक कर्ज थकविले आहे. त्यानंतर इतर मोठ्या बिगर बँकिग वित्तीय कंपन्यांनीही कर्ज थकविल्याचे समोर आले आहे. याचा परिणाम म्हणून बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्र मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर येणारी अनिश्चितता याचाही परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.
रुपया डॉलरच्या तुलनेत सकाळच्या सत्रात ५ पैशांनी सावरून वधारला आहे. सॅनक्टम वेल्थ मॅनेजमेंटचे मुख्य गुंतवणूक अधिकारी सुनील शर्मा म्हणाले, जागतिक पातळीवरील चिंतेच्या काही बाबी आहेत. याशिवाय भारतीय बाजारपेठेसमोर चलनाच्या तरलतेची समस्यादेखील आहे.