मुंबई - देशातील आर्थिक आकडेवारी निराशाजनक असताना जागतिक मंचावरील सकारात्मक बदलाने शेअर बाजारात तेजी निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४२८ अंशाने वधारून ४१,०५५.८० वर स्थिरावला. अमेरिका-चीन व्यापारातील कराराबाबत सकारात्मक वातावरण झाले आहे. त्यामुळे जगभरातील शेअर बाजार निर्देशांकही वधारले.
मुंबई शेअर बाजाराने यापूर्वी ४१,१६३.७९ विक्रमी निर्देशांक नोंदविला होता. मात्र, हा टप्पा मुंबई शेअर बाजाराला आज ओलांडता आला नाही. किरकोळ बाजारपेठेत वाढलेली महागाई आणि देशाचा जीडीपीचा घसरलेला विकासदर अशी देशातील आर्थिक स्थिती आहे. अशा स्थितीतही शेअर बाजार निर्देशांक ४२८ अंशाने वधारला आहे. निफ्टीचा निर्देशांक ११४.९० अंशाने वधारून १२,०८६.७० वर पोहोचला.
हेही वाचा-चिंताजनक! 'मूडीज'ने घटविला देशाच्या जीडीपीचा अंदाजित विकासदर
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
अॅक्सिस बँकेचे शेअर सर्वात अधिक ४.२१ टक्क्यांनी वधारला. वेदांतचे ३.७५ टक्के, एसबीआय ३.३९ टक्के, मारुतीचे ३.२० टक्के, इंडुसइंडचे ३.०७ टक्के तर येस बँकेचे २.८७ टक्क्यांनी शेअर वधारले.
भारती एअरटेलचे शेअर १.१८ टक्क्यांनी घसरले. कोटक बँकेचे १.३८ टक्के, बजाज ऑटोचे ०.८८ टक्के, एशियन पेंट्सचे ०.३१ टक्के, एचडीएफसीचे ०.०५ टक्के तर एचयूएलचे ०.०३ टक्क्यांनी शेअर घसरले.
हेही वाचा-ठराविक नव्हे तर सर्वच राज्यांचा जीएसटी मोबदला थकित - निर्मला सीतारामन
अमेरिका-चीन व्यापारी युद्ध संपण्याची शक्यता-
अमेरिका-चीनमधील व्यापारी कराराचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याचे काही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. गेली १७ महिने अमेरिका-चीनमध्ये सुरू असेलेल व्यापारी युद्ध संपणार आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार उत्साही झाले आहेत. चीनकडून अमेरिकेची आणखी उत्पादने खरेदी होण्याची शक्यता आहे. तर अमेरिका चीनच्या उत्पादित मालांवरील आयात शुल्क कमी करण्याची शक्यता आहे. इंग्लंडमधील सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळविल्याने बोरीस जॉन्सन यांची पंतप्रधानपदी फेरनिवड झाली आहे. त्याचे जगभरातील शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाले आहेत.