मुंबई - रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण सुरुच आहे. रुपया सकाळच्या सत्रात ६७ पैशांनी घसरून ७२.०९ वर पोहोचला. शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात सुमारे ४०० अंशाची घसरण व बँकांसह निर्यातदारांकडून डॉलरची झालेली मोठी मागणी या कारणांनी रुपयाची घसरण झाली आहे.
चलन विनिमय (फॉरेक्स) व्यापाऱ्यांनी सांगितले, की अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्याचा रविवारी परिणाम झाला. त्यामुळे रुपयावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत ३८ पैशांनी घसरून शुक्रवारी ७१.४२ वर पोहोचला होता.
इंटरबँक फॉरेन एक्सचेंज खुला होताना रुपया डॉलरच्या तुलनेत ७२ वर (१ डॉलर म्हणजे ७२ रुपये) पोहोचला होता. त्यानंतर रुपयाची घसरण होत ७२.०९ वर पोहोचला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी १ हजार १६२.९५ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.