मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्प ५ जुलैला सादर झाल्यापासून भांडवली बाजाराला मोठा फटका बसला आहे. महिनाभरातच गुंतवणुकदारांनी सुमारे १३.७ लाख कोटी गमाविले आहेत.
शेअर बाजाराचा निर्देशांक १९ सत्रात ३ हजार ४०० अंशाने ढासळला आहे. बँकिंग क्षेत्राला नव्या सरकारकडून अधिक आशा आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजाराने ४० हजार अंशाचा टप्पा ओलांडला होता. मात्र अर्थसंकल्पातील अति श्रीमंतावरील कराच्या तरतुदीने विदेशी गुंतवणूकदार चिंतेत आहेत. त्यामुळे विदेशी गुंतवणुकदारांनी भांडवली बाजारातून निधी काढण्यावर भर दिला आहे.
हे आहे शेअर बाजारातील निर्देशांकाच्या घसरणीचे कारण-
आर्थिक वर्ष २०१९ मध्ये पहिल्या सहा महिन्यात शेअर बाजाराने चांगले कमविले होते. ते सर्व एकाच म्हणजे गेल्या महिन्यात गमाविले आहे. स्थानिक पातळीवर असमाधानकारक मान्सून आणि मंदावलेल्या आर्थिक स्थितीने शेअर बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदार कपात करण्याचे दिलेले संकेत व अमेरिका-चीन व्यापारी युद्ध यांचाही शेअर बाजारावर नकारात्मक प्रभाव राहिला आहे.
ऑटोमोबाईल, सिंमेट, उत्पादन या क्षेत्रांसह एफएमसीजीमध्ये ग्राहकांकडून कमी मागणी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात मंदीसदृश्य स्थिती आहे.