मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर ३ टक्क्यांनी वधारले. भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स रिटेल व्हेंचरच्या सौद्याला मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर गुंतवणूकादारांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर खरेदीत उत्साह दाखविला आहे.
मुंबई शेअर बाजारात प्रति शेअरची किंमत १,९७० रुपये होती. रिलायन्स शेअरची किंमत सकाळी ११ वाजून ४२ मिनिटाला प्रति शेअर १,९६४ रुपये होती. मागील सत्राच्या तुलनेत शेअरची किंमत ६४.८० रुपयाने वाढली आहे. फ्युचर रिटेलची किंमत प्रति शेअर ७.९५ रुपयाने वाढून ७९ रुपये आहे. अॅमेझॉनने आक्षेप घेऊनही सीसीआयने रिलायन्स आणि फ्युचरच्या सौद्याला मंजुरी दिली आहे.
हेही वाचा-फ्युचर ग्रुप-रिलायन्स रिटेल सौद्यावर अॅमेझॉनचा आक्षेप; सेबीला लिहिले पत्र
सीसीआयने केले ट्विट
सीसीआयने रिलायन्स-फ्युचर ग्रुपच्या सौद्याला मंजुरी दिल्याचे ट्विट केले आहे. फ्युचर ग्रुपचा किरकोळ, घाऊक, गोदाम व्यवसायाचे अधिग्रहण करण्याच्या सौद्याला आयोगाने मंजुरी दिल्याचे सीसीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे. रिलायन्स रिटेल आणि फॅशन लाईफस्टाईल लि. (आरआरएफएलएल) ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या मालकीची कंपनी आहे. या कंपनीने किशोर बियानी यांच्या मालकीचा फ्युचर ग्रुपचा व्यवसाय २७ हजार ५१३ कोटी रुपयांना खरेदी केला आहे.
हेही वाचा-अॅमेझॉनला धक्का! रिलायन्स-फ्युचरच्या सौद्याला सीसीआयकडून मंजुरी
अॅमेझॉनने नियामक संस्थांनाही पाठविले पत्र-
फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स रिटेलमधील सौद्याबाबत कार्यवाही करावी, अशी ई-कॉमर्स अॅमेझॉनने सेबीला विनंती केली आहे. सिंगापूरच्या लवादाने २४ हजार ७१३ कोटींच्या सौद्याला दिलेल्या स्थगितीवर विचार करावा, असे अॅमेझॉनने सेबीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. सिंगापूरच्या लवादाने रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुपमधील सौद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. या निकालाची प्रत अॅमेझॉनने सेबीसह मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीलाही पाठविली आहे.