नाशिक - कोरोना महामारीच्या संकटात उद्योग सावरत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. शहरात टाळेबंदीनंतर स्थावर मालमत्ता क्षेत्र पुन्हा एकदा रुळावर येत आहे. सणासुदीच्या मुहूर्तावर मागील चार दिवसात शहरात 874 कोटींच्या मालमत्तांचे व्यवहार झाले आहे. या व्यवहारातून सरकारला 11 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
कोरोनामुळे मागील सहा महिने सर्वच व्यवहार ठप्प होते. त्याचा फटका स्थावर मालमत्ता व्यवसायालादेखील मोठा फटका बसला आहे. टाळेबंदी खुली केल्यानंतर आर्थिकचक्र पुन्हा एकदा रुळावर येत आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्र पुन्हा एकदा उभारी घेत आहे. नवरात्र उत्सव काळात 22 ते 26 ऑक्टोबर या चार दिवसात शहरातील सह निबंधक कार्यालयात 1 हजार 681 दस्त नोंदले गेले आहेत. त्यांचे बाजारमूल्य तब्बल 874 कोटी रुपये इतके आहे. या व्यवहारातून सरकारला आठ कोटी 84 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क तर दोन कोटी 578 लाखाचे नोंदणी फी असा एकूण 11 कोटींचा महसूल मिळाला आहे.
रविवारीदेखील मुद्रांक कार्यालयाचे कामकाज सुरू-
दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकांना दस्त नोंदणी करता यावी, अशी बांधकाम विकासकांनी मागणी केली होती. या मागणीला जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी प्रतिसाद देत सुट्टीच्या दिवशीदेखील कार्यालय सुरू ठेवली होती.
दिवाळीच्या काळातदेखील गृहखरेदी वाढणार-
टाळेबंदीच्या काळात स्थावर मालमत्ता क्षेत्राचा व्यवसाय अडचणीत सापडला होता. मात्र, नवरात्रीच्या चार दिवसात मोठ्या प्रमाणात नाशिककरांनी घर खरेदीला पसंती दिल्याचे बांधकाम व्यावसायिक नरेश कराड यांनी सांगितले. राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात 3 टक्के केलेली कपात, जीएसटीमधील सूट आणि राष्ट्रीय बँकांनी गृहकर्जावर कमी केलेल्या व्याजदरामुळे ग्राहकांकडून खरेदी होत असल्याचे कराड यांनी सांगितले. 40 लाखांहून कमी किमतीच्या घरांच्या किमतीला एक टक्के जीएसटी आणि एक टक्के मुद्रांक शुल्क आहे. शहरातील 70 ते 80 टक्के घरे ही 40 लाखांहून कमी किमतीची आहेत. दिवाळीच्या काळातदेखील नवीन घर खरेदीला ग्राहक पसंती देतील, असा विश्वास असल्याचे नरेश कराड यांनी सांगितले.