नवी दिल्ली - कांद्याची भाववाढ चालूच राहिल्यास सरकार व्यापाऱ्याकडील साठ्यावर मर्यादा घालण्याचा विचार करत आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी दिली. तसेच काळा बाजार आणि साठेबाजी करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
सरकार ग्राहक आणि शेतकरी या दोन्हींचे हित जोपासण्यासाठी संतुलितपणे काम करत असल्याचे राम विलास पासवान यांनी सांगितले. केंद्र सरकारने ५० हजार टन कांद्याचा अतिरिक्त साठा (बफर स्टॉक) केला आहे. त्यामधील १५ हजार टनचा साठा खुल्या बाजारात उपलब्ध केला आहे. कांद्याच्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्कात असल्याचेही पासवान यांनी सांगितले. सरकार कांद्याच्या किंमतीबाबत काही काळ 'पाहा आणि थांबा' असे धोरण स्विकारणार आहे. काद्यांच्या साठ्यावर मर्यादा घालून देण्याबरोबरच शेतकऱ्याचे हितदेखील हा चिंतेचा विषय असल्याचे पासवान यांनी सांगितले.
हेही वाचा-अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादन घटले; देशभरात भाव वाढणार?
येत्या काही दिवसात कांद्याच्या किंमती कमी होतील, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आश्वासन दिले आहे. नाफेडसारख्या संस्थांकडून देशातील बाजारात कांद्याच्या पुरवठ्यात सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-अज्ञाताने कांद्या चाळीत युरिया टाकल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान; जुन्नरमधील घटना
ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफने कांद्याचा अतिरिक्त साठा हा प्रति किलो २२ ते २३ रुपये किलो दराने विकला आहे. मदर डेअरीचे सफल स्टोअरमध्ये प्रति किलो २३.९० रुपया दराने कांदा विकत आहे. राजधानीत कांद्याचे दर हे प्रति किलो हे ७० ते ८० रुपयापर्यंत वाढले होते. देशाच्या इतर भागातही असेच दर वाढले होते. चांगला पुरवठा होण्यासाठी सर्व शक्य असलेल्या उत्तम मार्गाचा अवलंब केल्याचे तोमर यांनी सांगितले.
हेही वाचा-भाववाढीची 'करामत': राजधानीत सफरचंदांपेक्षा कांदे महाग!