मुंबई - टाळेबंदीत देशभरात अक्षय्य तृतीयेचा सण साजरा होत आहे. सराफ दुकाने बंद असताना ग्राहकांनी ऑनलाईन सोने खरेदीला चांगला प्रतिसाद दिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या सोन्याचा दर प्रति तोळा ४८ हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे.
नेहमीच्या तुलनेत अक्षय्य तृतीयेला सोन्याची मागणी नाही. असे असले तरी ऑनलाईन खरेदी हा व्यापाऱ्यांसाठी अक्षय्य तृतीयेचा हा शुभ संकेत असल्याचे मुंबई सोने चांदी व्यापार संघटनेचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी ई टीव्ही भारतला सांगितले. ऐन लग्नसराईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सराफांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गुढी पाडव्यालाही कोरोनाचे सावट असल्याने सराफ पेढ्यांना ग्राहकांचा थंड प्रतिसाद होता. मात्र, या अक्षय्य तृतीयेला सराफांनी ऑनलाईन व्यापार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ग्राहक सोने खरेदी करत असल्याची माहिती जैन यांनी दिली.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे समृद्धीचे प्रतिक मानले जाते. टाळेबंदीमुळे थेट दुकानात येणे ग्राहकांना शक्य होत नसल्याने अनेक ग्राहकांनी ऑनलाईन खरेदीला पसंती दिली आहे. ग्राहकांनी सोन्याच्या दागिन्यांनापेक्षा नाण्यांना अधिक पसंती दिली आहे. सोन्याच्या ५ ग्रामच्या नाण्यापासून १० ग्रामपर्यंतच्या नाण्यांना अधिक मागणी असल्याचे जैन यांनी सांगितले.
हेही वाचा-ऑक्सफोर्ड विद्यापीठनिर्मित कोरोना लसीचे पुण्यात सुरू होणार उत्पादन
एप्रिल महिन्यात लग्न मुहूर्तही टळले आहेत. ग्राहकांनी पुढच्या मुहूर्तांवर मंगलकार्य होणार असल्याने खरेदीसाठी चौकशी केली आहे. तसेच शुभकार्यासाठी अनेकांनी ५० ग्रामपर्यंतच्या ऑर्डर ऑनलाईन दिल्या आहेत. सोन्याचे दर आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत असल्याने ग्राहकांनी दागिने खरेदीसाठी उत्साह दाखविला नाही. तर ५० ग्राम सोन्याचे पैसे ऑनलाईन दिले आहेत. टाळेबंदी संपल्यानंतर संबंधित ग्राहकांना मागणीप्रमाणे दागिने घरपोच करण्याची सुविधा देणार आहोत, अशी जैन यांनी माहिती दिली.
हेही वाचा-व्हॉट्सअॅपद्वारे जिओमार्टची वस्तू विक्री 'या' शहरांमध्ये झाली सुरू
अक्षय्य तृतीयेला मुंबईच्या झवेरी बाजारात सुमारे २०० ते २५० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. त्या तुलनेत आजचा व्यापार थंड जरी असला तरी ग्राहकांनी प्रथमच सोन्याच्या ऑनलाईन खरेदीला पसंती दाखविली आहे.