नवी दिल्ली - नाफेडने १५ हजार टन कांदा खरेदीच्या निविदा आयातदारांकडून मागविल्या आहेत. या निविदेनुसार आयातदारांना २० नोव्हेंबरपर्यंत लाल कांदा पुरवावा लागणार आहे. देशात कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवणे व पुरेसा साठा उपलब्ध राहण्यासाठी सरकारने ही पावले उचलली आहेत.
नाफेडने कांदा आयातीच्या निविदेत ४० ते ६० मिमीच्या आकाराचा कांदा असावा, अशी अट घातली आहे. हा कांदा प्रति किलो ५० रुपयाने नाफेड आयातदारांकडून खरेदी करणार आहे. हा कांदा आयातदारांना जवाहरलाल नेहरू जहाज बंदर आणि कांडला बंदरावर पोहोचवावा लागणार आहे.
बाजारपेठेत कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध होणे अपेक्षित-
नाफेडचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक एस. के. सिंह म्हणाले, की १५ हजार टन कांदा आयात करण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध होणार आहे. नाफेडने गतवर्षीही कांद्याची आयात केली होती. मात्र, कांद्याचा आकार मोठा असल्याने काही राज्यांनी कांदा घेऊन जाण्यास नाफेडला नकार दिला होता. नाफडेने खुल्या बाजारात सुमारे ३७ हजार टन कांदा उपलब्ध केला आहे.
दरम्यान, देशभरात कांद्याच्या किमती प्रति किलो ७० रुपयापर्यंत पोहोचल्या आहेत.