मुंबई - शेअर बाजार खुला होताना २ हजार अंशांनी घसरला आहे. तर शेअर बाजार बंद होताना निर्देशांक १,९४१ अंशांनी घसरून ३५,६३४.९५ वरून पोहोचला. कोरोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम, येस बँकेवरील आर्थिक संकट व जागतिक बाजारातील खनिज तेलाचे घसरलेले दर या कारणांना शेअर बाजारात घसरण झाली आहे.
अर्थतज्ज्ञ आणि गुंतवणूकदार पंकज जयस्वाल म्हणाले, संपूर्ण जगभरातील शेअर बाजारात घसरण सुरू आहे. कोरोनामुळे मागणी कमी झाल्याने जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर घसरले आहेत. अशा स्थितीत सौदी अरेबियाने खनिज तेलाचे उत्पादन कमी केले आहे. मात्र, रशियाने खनिज तेलाचे उत्पादन कमी केले नाही. ओपेक या खनिज तेल उत्पादक देशांच्या संघटनेतील समन्वयाच्या अभावाने खनिज तेलाचे दर घसरले आहेत. खनिज तेलाचे दर घटणे हे भारतासाठी चांगले आहे. मात्र, जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. त्यामुळे देशातील शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. कोरोनाचाही शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. येस बँकेवरील संकटाचाही शेअर बाजारावर परिणाम झाला आहे, अशा विविध परिणामांमुळे शेअर बाजारात महाघसरण झाली आहे.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या आजचे दर
पुढे ते म्हणाले, की आपली अर्थव्यवस्था ही इकॉनॉमीमध्ये गेली आहे. त्यामुळे कमी कालावधीत अर्थव्यवस्थेला यामधून बाहेर पडणे शक्य होईल, असे वाटत नाही. खनिज तेलामुळे वाहतुकीचा खर्च कमी होणार आहे. पण रिलायन्स आणि सरकारी खनिज तेलाच्या कंपन्यांचे शेअर घसरले आहेत.
संबंधित बातमी वाचा-शेअर बाजारात २ हजार अंशांच्या 'घसरणीचा कंप'; गुंतवणूकदारांनी गमावले ५ लाख कोटी रुपये