बुलडाणा - मंदीचे सावट देशाप्रमाणेच जिल्ह्यातील 'रजतनगरी' म्हणून ओळख असलेल्या खामगाव येथे स्पष्ट दिसत आहे. ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने चांदीची १०० कोटींची उलाढाल केवळ ५० टक्के झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर व्यापाऱ्यांसह चांदीच्या कारागिरांवर संक्रांत येण्याची भीती व्यक्त होवू लागली आहे.
खामगावच्या चांदीच्या बाजारपेठेमधून दिल्ली, मुबंई ,कोलकाता व हैदराबादसारख्या शहरातील ग्राहक चांदीची आभूषण व भांडी खरेदी करण्यासाठी येतात. येथील कुशल कारागिरांनी कौशल्याने बनविलेल्या देवांच्या चांदीच्या मूर्ती देशभरात प्रसिद्ध आहेत. तसेच खामगावची शुद्ध चांदी म्हणून देशात ओळखली जाते. असे असूनही मंदीचा प्रभाव व सोने-चांदीचे अस्थिर दर या कारणांनी ग्राहक चांदीच्या बाजारपेठेत फिरकेनासे झाल्याचे विश्वकर्मा सिल्वर हाउसचे संचालक सुनील जागींड यांनी सांगितले.
येथील चांदी शुद्ध व प्रसिद्ध असल्याने सिद्धिविनायक मंदिर व संत गजानन महाराज मंदिर सारख्या मोठ्या देवस्थानाला येथील चांदीची मागणी असते. अनेक सिने कलावंतांसह राजकारणी मंडळी येथील चांदीची भांडी आवर्जून घेतात, असे विश्वकर्मा सिल्वर हाउसचे संचालक डॉ. कमल जागींड यांनी सांगितले.
खामगावात जवळपास ३० मोठी शोरुम आहेत. अत्यंत कुशल असे राजस्थान , पश्चिम बंगाल व हरियाणा येथील कारागिर काम करतात. चांदीचा भाव ५० हजार रुपये प्रतिकिलो झाल्याने लोक चांदी खरेदी करण्याऐवजी चांदी विकण्यासाठी आणत आहेत. त्यामुळे या कारागिरांवर बेरोजगार होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
गणेश उत्सवापासून सणासुदीचे दिवस सुरू होतात. हा मुहूर्त पाहून अनेकजण सोन्याचांदीचे दागिने खरेदी करतात. परंतु प्रचंड वाढलेले भाव बघून ग्राहक याकडे पाठ फिरविताना दिसत आहेत. अशीच परिस्थिति राहिली तर रजतनगरीतील हा व्यवसाय आणखी संकटात येण्याची भीती कारागीर अनिल निवल यांनी व्यक्त केली.