नवी दिल्ली - आयातीच्या कांद्यातील पहिल्या टप्प्याचा ७९० टन कांदा देशात पोहोचला आहे. हा कांदा दिल्लीसह आंध्रप्रदेशमध्ये ५७ ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. ही माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
आयात केलेला २९० टन आणि ५०० टन कांद्याची मुंबईत आवक झाली आहे. हा कांदा राज्य सरकारांना प्रति किलो ५७ ते ६० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. यापूर्वीच आंध्रप्रदेश आणि दिल्ली सरकारने कांद्याची मागणी केली आहे. या राज्यांनी आयातीचा कांदा घेण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा-शेतकरी जगवायचा असेल तर आयात थांबवा; कांदा उत्पादकांची आर्त हाक
कांद्याचे दर कडाडले-
देशातील बहुतांश शहरात १०० किलो प्रति दराने कांदा विकला जात आहे. तर काही शहरात कांद्याचे दर प्रति किलो १६० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी सरकारी संस्था असलेली एमएमटीसीने ४९ हजार टन कांदा आयातीचे कंत्राट दिले आहे.
तुर्की, इजिप्त आणि अफगाणिस्तानामधून कांदा आयात करण्यात आलेला आहे. या आयातीनंतर देशातील बाजारपेठेत कांद्याचा मुबलक साठा होईल, अशी अधिकाऱ्याने अपेक्षा व्यक्त केली. यापूर्वी कांद्याचे दर वाढले असताना सरकारने २०१५-१६ मध्ये १ हजार ९८७ टन कांद्याची आयात केली होती.
हेही वाचा-भारताला निर्यातस्नेही केंद्र बनवा - मनू जैन
दरम्यान, विदेशातील कांद्याची आयात होत असल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने कांदा आयात बंद करून निर्यातीला परवानगी द्यावी, अशी शेतकरीवर्गातून मागणी होत आहे.