नवी दिल्ली - ह्युंदाई मोटर इंडियाच्या आय २० प्रिमीयम हॅचबॅकला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या कारच्या लाँचिंगनंतर २० दिवसात २० हजार ग्राहकांनी खरेदीसाठी बुकिंग केली आहे.
ग्राहकांना ४ हजार आय २० प्रिमीयम हॅचबॅक सणाच्या दरम्यान दिल्याचे ह्युंदाई मोटर इंडियाने म्हटले आहे. एचएमआयएलचे संचालक (विक्री, विपणन आणि सेवा) तरुण गर्ग म्हणाले, की आम्हाला आय२० च्या कार विक्रीत दिवाळीत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे ८५ टक्के ग्राहकांनी स्पोर्टझला पसंती दर्शविली आहे. नवीन आय२० कारमुळे नवीन तंत्रज्ञान असलेल्या कारला मागणी असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा-आपत्कालीन स्थितीत लसीच्या वापराकरता परवानगी द्यावी; 'या' कंपनीची अमेरिकन सरकारकडे मागणी
पुढे गर्ग म्हणाले, की ४५ टक्के ग्राहकांनी ब्ल्यूलिंक तंत्रज्ञान असलेल्या कारची निवड केली आहे. तर ३० टक्के ग्राहकांनी सनप्रुफ आणि ३५ टक्के ग्राहकांनी एअर प्युरिफायरचा पर्याय निवडला आहे. तर २० टक्के ग्राहकांनी १.५ लिटर डिझेल इंजिनच्या कारचा पर्याय निवडला आहे. ह्युंदाईने नोव्हेंबरच्या सुरुवातीला आय २० हे नवीन मॉडेल लाँच केले आहे. या कारची किंमत ६.७९ ते ११.१७ लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. ही कार मारुती सुझुकी बलेनो, टाटा अल्ट्रोझ, होंडा जाझ आणि फोक्सवॅगनच्या पोलोशी स्पर्धा करणार आहे.
हेही वाचा-अॅमेझॉनला धक्का! रिलायन्स-फ्युचरच्या सौद्याला सीसीआयकडून मंजुरी
कंपनीच्या एमडीने हा व्यक्त केला होता विश्वास
ह्युंदाई मोटर इंडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. किम म्हणाले, 'आय -20 हा एक दशकाहून अधिक काळ आधुनिक भारतीय ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करत ह्युंदाईसाठी एक सुपर परफॉर्मर ब्रँड आहे. आय -20 ही चारचाकी प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये आपल्या शानदार स्टाइल, नवीन तंत्रज्ञानासह बेंचमार्कची पुन्हा स्थापना करेल, असा विश्वास किम यांनी कारच्या लाँचिंगनंतर व्यक्त केला होता.