नवी दिल्ली - सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. सोन्याच्या किमती दिल्लीत प्रति तोळा (१० ग्रॅम) १६३ रुपयांनी घसरून ४६,७३८ रुपये आहे. तर रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत वधारले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,९०१ रुपये होता. सोन्याचे दर घसरले असले तरी चांदीचे दर वधारले आहेत. चांदीचा दर प्रति किलो ५३० रुपयांनी वधारून ६७,४८३ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६६,९५३ रुपये होता. रुपयाचे मूल्य हे डॉलरचे तुलनेत ३ पैशांनी वधारून एका डॉलरसाठी ७२.९३ रुपये आहे. हे रुपयाचे मूल्य बाजार खुला होत असताना राहिले आहे.
हेही वाचा-डिजीटल चलनावर आरबीआय लवकरच करणार शिक्कामोर्तब
सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात
दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. केंद्र सरकारने सोने-चांदीच्या व्यापाराचा मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी सोने व चांदीचे दर अस्थिर असतात. सोने व चांदीचे दर स्थिर रहावेत, त्या माध्यमातून व्यापाराला चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकारने सोने व चांदीच्या व्यापाराला मल्टी कमोडिटी एक्सचेंजमधून वगळले पाहिजे, अशी अपेक्षा जळगावातील सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली होती.
हेही वाचा-येत्या आर्थिक वर्षात विकासदर १०.५ टक्के राहिल-आरबीआयचा अंदाज