नवी दिल्ली - शेअर बाजाराचा निर्देशांक नवा विक्रम करत असताना सोनेही महागले आहे. सोन्याची किमत नवी दिल्लीत प्रती तोळा ५७५ रुपयांनी वाढून ४९,१२५ रुपये आहेत. मागील सत्रात सोन्याची किंमत प्रति तोळा ४८,५५० रुपये होती.
सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीचे दर वधारले आहेत. चांदीचा दर प्रति किलो १,२२७ रुपयांनी वाढून ६६,६९९ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६५,४७२ रुपये होता.
दिल्लीत सलग चौथ्या दिवशी स्पॉट गोल्ड २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ५७५ रुपयांनी वाढल्याची माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस १,८७०.५० डॉलरवर स्थिर राहिले आहेत.
हेही वाचा-इफ्को आर्थिक उलाढालीत सहकारी संस्थांमध्ये जगात अव्वल
मुंबई शेअर बाजाराचा ऐतिहासिक विक्रम
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजार हा 50 हजारांच्या उंबरठ्यावर होता. त्यामुळे ही पातळी शेअर बाजार कधी ओलांडणार याकडे सर्वांचे लक्ष होते. गुरूवारी सकाळी शेअर बाजाराने ही पातळी गाठली. बाजाराला सुरूवात होताच सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारून ५०,१२६ अंशांवर पोहोचला.
हेही वाचा-जाणून घ्या, शेअर बाजार ५०,०००हून अधिक ओलांडण्याची कारणे
जागतिक बाजाराचा सोन्यासह चांदीच्या दरावर होतो परिणाम-
दरम्यान, सोन्यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. कोरोना महामारीच्या अस्थिरतेत गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये अधिक प्रमाणात गुंतवणुकीला प्राधान्य दिले होते. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार गुंतवणुकीतील सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन बाबींचा विचार करतात. त्यानंतर सोने आणि चांदी खरेदी व विक्रीला प्राधान्य देत आहेत. दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय बाजाराचा कल बदलत आहे. त्यामुळे सोने व चांदीचे दर अस्थिर आहेत.
दरम्यान, केंद्रीय महसूल विभागाने सोने खरेदीवरील नियम शिथील केले आहेत. सोने, चांदी, दागिने आणि रत्ने आणि खड्यांची खरेदी २ लाखांहून कमी असेल तर ग्राहकाला आधार कार्ड किंवा इतर केवायसी कागदपत्रांची पूर्वीप्रमाणे गरज भासणार नाही.