नवी दिल्ली - सोन्यासह चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. नवी दिल्लीत सोने प्रति तोळ्याला १२१ रुपयांनी घसरून ५० हजार ६३० रुपयावर पोहोचला आहे. ही माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ५० हजार ७५१ रुपये होता. दिल्लीत चांदीचा दर प्रति किलो ६० हजार ९८ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६१ हजार ३७५ रुपये होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अंशत: वधारले आहेत. डॉलर हा बळकट होत असल्याने सोन्याच्या किमतीवर दबाव असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल यांनी सांगितले.
जुलै-सप्टेंबरमध्ये सोन्याच्या मागणीत ४८ टक्के घसरण-
दरम्यान, एप्रिल-जून २०२० च्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत सुधारणा झाली आहे. असे असले तरी गतवर्षीच्या जुलै-सप्टेंबरच्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत ४८ टक्के घसरण झाली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या (डब्ल्यूजीसी) आकडेवारीनुसार सप्टेंबरच्या तिमाहीत ५२.८ टन सोन्याची मागणी होती. स्थानिक बाजारात सोने प्रति तोळा ५० हजारांहून अधिक झाले होते. त्यामुळे कमी वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांकडे ग्राहक वळले आहेत