मुंबई - येत्या १२ ते १५ महिन्यांत सोन्याचा दर प्रति तोळा ४७,००० रुपये होवू शकतो, असा अंदाज मोतीलाल ओसवाल या दलाल पेढीने व्यक्त केला आहे. कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर वाढतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एप्रिलमध्ये लग्नसराई आणि सोन्यावरील वाढलेले आयात शुल्क या कारणांनी सोन्याचे दर वाढत आहेत. सोन्याचे दर वाढले तर मागणी कमी होवू शकते, असे मोतीलाल ओसवालने म्हटले आहे.
मागील दोन सत्रात सोन्याचे दर कमालीचे वाढले आहेत. अद्याप, कोरोना विषाणूवर उपचार नाहीत. पीपल्स बँक ऑफ चायनाने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही घोषणा केल्या आहेत. मात्र, कोरोनामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, असे पिपल्स बँक ऑफ चायनाने म्हटले आहे.
हेही वाचा-'भारत हा जगात सर्वाधिक आयात शुल्क असलेला देश'
कोरोनामुळे चीनमध्ये सुमारे २,६६३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७७,६५८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना ही चीनमधील आजपर्यंतची सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्याला आपत्ती असल्याचे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-खुली मिठाई खाताय, १ जूनपासून लागू होणार हा नवा नियम
इटली, दक्षिण कोरिया आणि इराणमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या उत्पादित मालांवरील आयात शुल्क २०१८ मध्ये वाढविल्यापासून सोन्याचे दर वाढत आहेत. दोन आर्थिक महासत्तांमधील व्यापार युद्धाने जागतिक आर्थिक मंचावर अनिश्चितता होती. त्यानंतर तशीच अनिश्चितता कोरोनामुळे झाल्याचे मोतीलाल ओसवाल या दलाल पेढीने म्हटले आहे.