मुंबई - टाळेबंदी असल्याने दोन महिन्यांपासून दादर पश्चिमेकडील फूल बाजार बंद आहे. हीच स्थिती राज्यातील सर्व फुल मार्केटमध्ये आहे. अशा स्थितीत विक्रेत्यांची उपासमार होत असल्याने फुल मार्केट सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल बाजार मंडईचे सचिव दिनेश पुंडे यांनी सरकारकडे केली आहे.
माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल बाजार मंडईचे सचिव दिनेश पुंडे म्हणाले, की फुल शेतीचेही मोठे नुकसान होत आहे. जे फुलांचे नवीन पीक आले आहे, त्यातील फुले विकण्यासाठी तरी मार्केट सुरू करण्याची सरकारने परवानगी देणे गरजेचे आहे.
हेही वाचा-मास्क हीच तुमची नवी ओळख; गुजरातच्या फोटोग्राफरने 'असा' शोधून काढला जुगाड
आर्थिक उलाढालीचा हंगाम गेला वाया-
साधारणतः मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत विविध सण, उत्सव, लग्न सोहळे असतात. त्यामुळे फुलांचा व्यापार तेजीत असतो. याच महिन्यात गुढी पाडवा, अक्षय तृतीया, हनुमान जयंती, रामनवमी, रामजाण ईद असे महत्वाचे सण असतात. या कालावधीत फूल व्यवसायाची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. पण हे फूल विक्रेते व फूल उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न बुडाले आहे.
हेही वाचा-स्टेट बँकेचा धक्का; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदरात कपात
फूल व्यवसायावर लाखो लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून
कोरोना संकट सुरू झाल्यापासून राज्यातील सर्व फूल मार्केट बंद आहेत. फूल व्यवसाय पूर्णतः शेतीवर अवलंबून असतो. फूल बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील कित्येक शेतकरी वर्षभर फक्त फुलांचीच शेती करतात. या व्यवसायात लाखो लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
हेही वाचा-'इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात मोठी संधी'
फूल विक्री बंद झाल्याने विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ-
दादरच्या फूल मार्केटमध्ये 634 फूल विक्रेत्याची दुकाने आहेत. तर दादर स्थानक परिसरातदेखील काही फूल विक्रेते व्यवसाय करतात. फूल बाजारात दररोज फुलांच्या 30 ते 40 गाड्या येतात. मात्र सारे व्यवहार ठप्प झाल्याने विक्रेत्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. माँसाहेब मीनाताई ठाकरे फूल बाजार बंद असल्याने तेथील फूल विक्रेत्यानंवर उपासमारीची वेळ आली आहे. पालिकेकडे पत्रव्यवहार करूनही उत्तर दिले नाही, असे त्यांनी सांगितले.
सरकारच्या सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियम व अटींचे पालन करण्यास तयार असल्याचे दिनेश पुंडे यांनी सांगितले. राज्यातील फुल विक्रेत्यांच्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी त्यांनी मागणी केली आहे.