नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटामुळे अन्न सुरक्षा नियामक एफएसएसएआयने मिठाई विक्रेत्यांना काहीसा दिलासा दिला आहे. मिठाई विक्रेत्यांना खुल्या मिठाईवर वापरण्याची तारीख लिहिण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
मिठाईच्या दुकानांमधील गोड पदार्थांची विक्री करताना विक्रेत्यांना नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. मिठाई विक्रेत्यांना खुली मिठाई कधी तयार केली आहे व किती दिवसापर्यंत खाण्यास योग्य आहे, याची माहिती दर्शवावी लागणार आहे. हा एफएसएसएआयचा निर्णय १ जून, २०२० पासून लागू होणार होता. यानंतर मुदतवाढ देत नियमांचे पालन करण्यासाठी 1 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती.
टाळेबंदी आणि महामारीने व्यवसाय विस्कळीत झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्रेत्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी 1 ऑक्टोबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यामुळे मुदतवाढ दिल्याचे एफएसएसएआयने म्हटले आहे.
1 ऑक्टोबरपूर्वी नियमांचे पालन करण्यासाठी दुकाने सॅनिटाईज करावेत व क्षमता तयार करावी, असा मिठाई दुकानदारांच्या प्रतिनिधींना सल्ला दिल्याचे एफएसएसएआयने म्हटले आहे.
सध्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) नियमानुसार केवळ पॅकिंग केलेल्या मिठाईसाठी नियम आहेत. मुदत संपलेली खुली मिठाई खाल्ल्याने ग्राहकांच्या आरोग्याला अपाय होत असल्याचे काही अहवालामधून समोर आले आहे. त्यामुळे एफएसएसएआयने निर्देश जारी केले होते.