नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात भाजीपाला आणि अंड्यांचे दर कमालीचे वाढले आहेत. या दरवाढीनंतर किरकोळ बाजारपेठेत महागाईने ऑक्टोबरमध्ये गेल्या सहा वर्षातील उच्चांक गाठला आहे. किरकोळ बाजारपेठेत ऑक्टोबरमध्ये महागाईचे प्रमाण हे ७.६१ टक्के राहिले आहे. हे महागाईचे प्रमाण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्धारित मर्यादेहून अधिक आहे.
केंद्र सरकारने ग्राहक किंमत निर्देशांक गुरुवारी जाहीर केला आहे. किरकोळ बाजारपेठेत सप्टेंबरमध्ये महागाईचे प्रमाण हे ७.२७ टक्के राहिले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये किरकोळ बाजारपेठेत महागाईचे प्रमाण हे ७ टक्क्यांहून अधिक राहिले आहे. यापूर्वी मे २०१४ मध्ये महागाईचे सर्वाधिक प्रमाण ८.३३ टक्के होते.
असे राहिले ऑक्टोबरमध्ये महागाईचे प्रमाण-
- ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) ऑक्टोबरमध्ये ११.०७ टक्के राहिला आहे. तर सप्टेंबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकाचे प्रमाण हे १०.६८ टक्के होते. तर गतवर्षी ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक ४.६२ टक्के होता.
- गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबरमध्ये भाजीपाल्याच्या किमती २२.५१ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
- प्रथिनयुक्त मांस आणि माशांचे दर १८.७० टक्क्यांनी वाढले आहेत. तर अंड्यांच्या किमती २१.८१ टक्क्यापर्यंत वाढल्या आहेत.
- इंधन व वीज निर्मितीच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण घसरून ऑक्टोबरमध्ये २.२८ टक्के राहिले आहे. याच वर्गवारीत महागाईचे प्रमाण हे २.८७ टक्के होते.
- दूध व दुग्धजन्य उत्पादनांच्या किमती घसरून ५.२० टक्के झाल्या आहेत. सप्टेंबरमध्ये दुग्ध व दुग्धजन्य उत्पादनांच्या किमती ५.६४ टक्के होत्या.
किरकोळ बाजारपेठेतील महागाईने ओलांडली मर्यादा
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण निश्चित करताना किरकोळ बाजारातील महागाईचा विचार करण्यात येतो. केंद्र सरकारने महागाईचा दर जास्तीत जास्त ४ टक्के तर कमीत कमी २ टक्के ठेवण्याची मर्यादा आरबीआयला घालून दिली आहे. ही मर्यादा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ओलांडली आहे.
रेपो दरात कपात होण्याची शक्यता-
इक्रा या पतमानांकन संस्थेच्या अर्थतज्ज्ञ आदिती नायर म्हणाल्या, की काही प्रमाणात भाजीपाल्यांच्या किमती कमी झाल्यास चालू महिन्यात महागाईचे प्रमाण कमी होऊ शकते. मात्र, महागाई ही डिसेंबर २०२० मध्येच ६ टक्क्यांहून कमी होईल, अशी शक्यता आहे. ऑक्टोबर २०२० मधील महागाईचे प्रमाण हे चिंताजनक आहे. आरबीआयकडून डिसेंबर २०२० मध्ये रेपो दरात कपात होण्याची शक्यता आहे. अशीच स्थिती राहिली तर फेब्रुवारी २०२१ मध्ये रेपो दरात कपात होण्याची शक्यता असल्याचे नायर यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या महिन्यापासून किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे दर प्रति किलो ७० रुपयांवरून अधिक आहेत.