नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेमध्ये सादर करण्यात येणार आहे. या दिवशी शनिवारी असूनही मुंबई शेअर बाजार सुरू राहणार आहे. सामान्यत: मुंबई शेअर बाजाराचे कामकाज शनिवारी बंद असते.
मुंबई शेअर बाजाराचे १ फेब्रुवारीला सकाळी सव्वानऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे. तर शेअर बाजार खुला होण्यापूर्वी ट्रेडिंग सकाळी नऊ ते सव्वानऊ वाजेपर्यंत राहणार आहे.
तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २८ फेब्रुवारील २०१५ ला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. या दिवशीही शनिवार असताना मुंबई शेअर बाजार सुरू राहिला होता.
हेही वाचा-व्होडाफोनचा फेसबुकला धक्का; लिब्रा क्रिप्टोचलनामधून घेतली माघार
विविध क्षेत्रांसह मुंबई शेअर बाजाराला केंद्रीय अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. चालू वर्षाच्या जूलै-सप्टेंबरच्या तिमाहीत राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर (जीडीपी) हा ४.५ टक्के राहिला आहे. हे जीडीपीचे प्रमाण २०१३ नंतर सर्वात कमी राहिले आहे. चालू आर्थिक वर्षात विकासदर हा ५ टक्के राहिल, असा केंद्र सरकारने अंदाज व्यक्त केला आहे. हा गेल्या ११ वर्षातील सर्वात कमी विकासदर असणार आहे.
हेही वाचा-मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या संकटात पडली भर; 'हे' आहे कारण