नवी दिल्ली - देशातील कांद्याची किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. दिवाळीपूर्वी देशात २५ हजार टन कांदा आयात करण्यात येणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालय पीयूष गोयल यांनी सांगितले. ते ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते.
देशात कांद्याच्या किमती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर नाफेडने कांदा आयात सुरू केल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. ते म्हणाले, की ३० हजार टन बटाटे भूतानमधून आयात करण्यात आले आहे. त्यामागे देशातील पुरवठा स्थिर राहून किमती नियंत्रण राहणे हा उद्देश आहे.
तीन देशांमधून होणार कांदा आयात-
पीयूष गोयल म्हणाले, की गेल्या तीन दिवसांपासून किरकोळ विक्रीत कांद्याच्या किमती स्थिर राहून प्रति किलो ६५ रुपये आहेत. कांद्याच्या किमती नियंत्रणात राहण्यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत. कांद्याच्या निर्यातीवर वेळेवर बंदी लागू केली आहे. केंद्र सरकारने कांदा आयातीसाठी डिसेंबरपर्यंत नियम शिथील केले आहेत. खासगी व्यापाऱ्यांकडून ७ हजार टन कांदा आयात करण्यात आला आहे. इजिप्त, अफगाणिस्तान आणि तुर्कीमधून खासगी व्यापाऱ्यांकडून कांदा आयात करण्यात येत आहे. कांदे बियांच्या निर्यातीवर ही बंदी लागू केल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले.
यामुळे देशात वाढले कांद्याचे दर
कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटकला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत नव्या कांद्याची आवक कमी झाली आहे. अशा परिस्थितीमुळे कांद्याचे दर पुण्यासह काही जिल्ह्यांत प्रति किलो १०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत.