नवी दिल्ली – टाळेबंदीमुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी आणि देशातील उत्पादन कमी झाले असताना चिनी स्मार्टफोनच्या आयातीवर परिणाम झाला नाही. जुनच्या तिमाहीत देशात आयात होणाऱ्या चारपैकी तीन स्मार्टफोन हे चिनी कंपन्यांचे असल्याचे एका अहवालातून दिसून आले आहे.
देशात चिनी मालावर बहिष्काराची मागणी होत असताना चिनी स्मार्टफोन कंपन्यांना विक्री करण्याचे आव्हान आहे. अशा स्थितीत सॅमसंगला कार्यक्षम पुरवठा साखळीचा सर्वाधिक फायदा होणार असल्याचे सीएमआर कंपनीच्या अहवालात म्हटले आहे. भक्कम पुरवठा साखळी असल्याने सॅमसंगला बाजारात अधिक हिस्सा वाढविता येणे शक्य आहे. याबाबत सीएमआर कंपनीचे व्यवस्थापक अमित शर्मा म्हणाले, की येत्या तिमाहीत सॅमसंगकडून बाजारात कशी कामगिरी होते, हे पहावे लागेल. चिनी स्मार्टफोन कंपन्यांचे वर्चस्व असताना सॅमसंगला स्पर्धा करावी लागणार आहे. तिसऱ्या तिमाहीत सॅमसंगची खरी परीक्षा ठरणार आहे.
चिनी स्मार्टफोनचा बाजारपेठेतील हिस्सा घसरला-
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत चिनी स्मार्टफोन कंपन्यांचा हिस्सा मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेने 73 टक्क्यांनी घसरला आहे. तर जुनच्या तिमाहीत स्मार्टफोनची होणारी आयात ही गतवर्षीच्या जुनच्या तिमाहीपेक्षा 41 टक्क्यांनी कमी झाली आहे. शाओमी (30 टक्के), सॅमसंग (24 टक्के) व विवो (17 टक्के) यांचा स्मार्टफोनचा असा स्मार्टफोनच्या बाजारपेठेत हिस्सा आहे. नोकियाचा स्मार्टफोनचा बाजारातील हिस्सा घसरला आहे. अॅपलचा बाजारातील आठवा क्रमांक आहे. असे असले तरी अॅपलच्या आयफोन एसई (2020) ची मागणी वाढत आहे. शाओमी रेडमी 8 ए ड्युअल, रेडमी 8 आणि रेडमी नोट 8 या मॉडेलचा स्मार्टफोनचा देशातील स्मार्टफोनच्या आयातीत 60 टक्के हिस्सा आहे.