नवी दिल्ली - सर्वात अधिक विषमता असलेल्या देशापैकी भारत असल्याने जीडीपीच्या घसरणीचा गरिंबावर सर्वात मोठा वाईट परिणाम होतो. सर्व लोकांचे एकत्रित उत्पन्न घसरत असताना नोकऱ्यांचे प्रमाणही कमी होते.
जीडीपी कमी झाल्याने काय परिणाम होतो, याची माहिती इंदिरा गांधी संशोधन संस्थेचे प्राध्यापक आर.नागराज यांनी दिली.
ते म्हणाले, आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये मासिक दरडोई उत्पन्न हे १० हजार ५३४ रुपये होते. वार्षिक ५ टक्के विकासदर गृहित धरला तर, आर्थिक वर्ष २०२० मध्ये मासिक दरडोई उत्पन्न हे ५२६ रुपयाने वाढणे अपेक्षित आहे. मात्र मासिक दरडोई उत्पन्न हे ४ टक्क्यांनी वाढले तर मासिक उत्पन्न हे केवळ ४२१ रुपयाने वाढते. जर विकासदर १ टक्क्याने कमी झाला तर दरडोई उत्पन्न हे १०५ रुपयाने कमी होते. याचाच अर्थ जर विकासदर अथवा जीडीपी हा ५ टक्क्यावरून ४ टक्के झाला तर मासिक उत्पन्न हे १०५ रुपयाने कमी होते. तर वर्षाचा विचार केला तर वार्षिक दरडोई उत्पन्न हे १ हजार २६० रुपयाने उत्पन्न कमी होते.
जीडीपीचे घटले प्रमाण-
सलग पाचव्या तिमाहीत जीडीपी घसरून चालू तिमाहीमधील एप्रिल-जूनदरम्यान ५ टक्के जीडीपी झाला आहे. तर आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये जीडीपीचे प्रमाण हे ८ टक्के होते. बहुतांश आर्थिक संशोधन करणाऱ्या संस्थांनी पूर्ण आर्थिक वर्षात जीडीपी कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. इंडिया रेटिंग्ज आणि रिसर्च संस्थेने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये जीडीपी हा ७.३ टक्के राहिल असा अंदाज वर्तविला होता. त्यामध्ये घट करून जीडीपी हा ६.७ टक्के राहिल, असा अंदाज केला आहे. जीडीपी घसरण्याचे हे सलग तिसरे वर्ष असणार आहे.
देशांतर्गत आणि जागतिक समस्या पाहता चालू आर्थिक वर्षात जीडीपी हा ६.४ टक्के राहील, असा अंदाज मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने व्यक्त केला आहे.
इक्राचे मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर म्हणाल्या उत्पादन कमी झाल्याने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये जीडीपी कमी होण्याचा अंदाज आहे. इतर सर्व क्षेत्राची हीच परिस्थिती असेल, असेही नायर यांनी सांगितले.
जीडीपी घसरल्याचा सर्वात मोठा गरिबांना फटका -
वरिष्ठ अर्थतज्ज्ञ नागराज यांनी जीडीपी कमी झाल्याचा सर्वसामान्यावर काय परिणाम होतो, याची माहिती दिली. ते म्हणाले, कमी जीडीपी झाल्याने त्या प्रमाणात दरडोई उत्पन्नात घसरण होते. त्यातून अर्थव्यवस्थेत विषमता आणखी वाढते. जीडीपी घसरल्याचा गरिबांना सर्वात मोठा फटका बसतो. याचा परिणाम म्हणून दारिद्रय रेषेखालील लोकांची संख्या वाढू शकते. जीडीपी घसरल्याने रोजगाराचे प्रमाण कमी होते, असेही ते म्हणाले.