रेवारी - देशभरातील गावांमधून देण्यात येणारी वायफाय सेवा ही मार्च २०२० पर्यंत मोफत देण्यात येणार आहे. ही माहिती केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर यांनी दिली. यापूर्वीच भारतनेट ऑप्टिकल फायबर नेटवर्कमधून १.३ लाख ग्रामपंचायतींना जोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
रवीशंकर प्रसाद म्हणाले, भारतनेट ऑप्टिकल फायबर नेटवर्कमधून २.५ लाख ग्रामपंचायती जोडण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. भारतनेट सेवेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व गावांमध्ये वायफायची मोफत सेवा देण्यात येणार आहे. देशातील ४८ हजार गावांना भारतनेट प्रकल्पाचे वायफाय मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-नोटीसशिवाय राजीनामा देण्याची परवानगी द्या; एअर इंडियाच्या वैमानिकांची मागणी
सामान्य सेवा केंद्रांमधून (सीएससीएस) बँकिंगच्या सेवा दिल्या जाणार आहेत. सीएससीच्या ठिकाणावरून डिजिटल सेवा देण्यात येणार आहेत. या केंद्रांची संख्या २०१४ मध्ये ६० हजार होती. ही संख्या वाढून सध्या ३.६० लाख एवढी झाली आहे. हरियाणामध्ये सुमारे ११ हजार सीएससीएस आहेत. त्यामधून ६५० विविध सेवा दिल्या जातात. सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि. ही कंपनी डिजीटल गावांसाठी आणि दुर्गम भागांसाठी उपक्रम राबवित आहे. सरकारी माहितीनुसार, देशामधील १ लाख गावे डिजीटल होण्याच्या टप्प्यावर आहेत.
हेही वाचा-जीएसटीचे दर सतत बदलू नये; नीती आयोग सदस्याचे मत
हरियाणामधील रेवारी जिल्ह्याच्या गुरवारा गाव हे सीएससीने विकसित केलेले डिजिटल गाव आहे. या गावामध्ये नागरिकांना डिजीटल सेवा पोर्टलमधून सेवा दिल्या जात आहेत. डिजीगाव अथवा डिजीटल व्हिलेज म्हणजे यामध्ये गावातील नागरिकांना विविध केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या आणि खासगी कंपन्यांच्या सेवा दिल्या जातात.