नवी दिल्ली - सार्वजनिक टीका रोखल्याने धोरणात चूक होते, असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सरकारला दिला. यंत्रणेतील लोकांनी टीका सहन करायला पाहिजे, असेही त्यांनी नाव न घेता मोदी सरकारला टोला लगावला.
रघुराम राजन यांनी ब्लॉगमध्ये पोस्ट लिहून अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर निशाणा साधला. ते सध्या शिकागो विद्यापीठात वित्त विभागाचे प्राध्यापक आहेत.
रघुराम राजन यांनी काय म्हटले आहे ब्लॉगमध्ये
सरकारला धोरणात योग्य अशी सुधारणा करण्यासाठी केवळ टीका प्रोत्साहित करू शकते. जर प्रत्येक टीकेवर सरकारी यंत्रणेतून फोन येत असेल अथवा सत्ताधारी पक्षाच्या ट्रोल आर्मीकडून लक्ष्य होत असेल तर अनेकजण टीका कमी करतील. सरकार हे सुखद वातावरणात राहिल. कटू सत्य समोर येईल तेव्हा ते नाकारणे शक्य होईल, असा त्यांनी इशारा दिला. मागील नोकरीच्या काळात वैयक्तिक हल्ल्याचा अनुभव आल्याचे त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
सततची टीका केल्याने धोरणात वेळोवेळी सुधारणा करता येते, असे त्यांनी मत व्यक्त केले. सार्वजनिकपणे होणाऱ्या टीकेवर दबाव टाकल्याने सरकारचे स्वत:चेच एकूण नुकसान होते.
मोदी सरकारने आर्थिक सल्लागार परिषदेवरून रतीन रॉय आणि शमिका रवी यांना हटविले आहे. त्या पार्श्वभूमीवर राजन यांची टीका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
कोण आहेत रतीन रॉय आणि शमिका रवी
शमिका देवी हे ब्रुक्रिंग्ज इंडियाच्या संशोधन विभागाचे संचालक आहेत. तर रतीन रॉय हे राष्ट्रीय सार्वजनिक वित्त आणि धोरण संस्थेचे संचालक आहे. त्यांनी विदेशातील बाजारात सरकारी रोखे विकून कर्ज घेण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला होता. राजन यांनीदेखील विदेशातील बाजारामधून सरकारी रोखे विकण्याच्या निर्णयावर सरकारला सावधगिरीचा इशारा दिला होता.