मुंबई - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) एमसीएलआरमध्ये ५ बेसिस पाँईटने कपात केली आहे. या कपातीने एमसीएलआरशी संलग्न असलेले गृह कर्ज, वाहन कर्जासह इतर कर्ज स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर बँकेतील मुदत ठेवीवरील व्याजदर कमी होणार आहेत.
स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षात सलग नवव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. स्टेट बँकेचे एमसीएलआरचे दर हे ७.९० टक्क्यांवरून ७.८५ टक्के होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर ५.१५ टक्के कायम ठेवला आहे. बाजारात चलनाची मुबलकता आहे. कमी ठेवीवरील व्याजदर ( २ कोटी रुपयांवरून कमी) हे १० ते १५ बेसिस पाँईटने कपात करण्यात आले आहे. तर अधिक ठेवीवरील व्याजदर ( २ कोटी रुपयांहून अधिक) हे २५ ते ५० बेसिस पाँईटने कमी करण्यात आले आहेत. आरबीआयच्या धोरणातील सुधारणा आणि ठेवीवरील व्याजदरातील कपात ही आगामी पतधोरण समितीमध्ये दिसून येणार आहे.
हेही वाचा-आरबीआय म्हणते, कोरोना रोगाचा पर्यटनासह व्यापारावर होणार परिणाम
जाणून घ्या, काय आहे एमसीएलआर-
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेडिंग रेट्स (एमसीएलआर) ही भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेली पद्धत आहे. याचा वापर करून वाणिज्य बँकांकडून देण्यात येणारे कर्जाचे व्याज ठरविले जातात. याचा वापर बँकांकडून नोटाबंदीनंतर सुरू करण्यात आला. एमसीएलआरच्या अंमलबजावणीच्या ग्राहकांना फायदा होतो. कारण आरबीआयकडून रेपो दरात कपात झाल्यानंतर बँकांना कर्जाचे व्याजदर कमी करावे लागतात.
हेही वाचा-अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आरबीआयकडे केवळ व्याजदराचे साधन नाही - शक्तिकांत दास