नवी दिल्ली - देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी 20 लाख कोटींचे दिलेले पॅकेज हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. जग कोरोनाच्या संकटाचा सामना करता आहे. अशा स्थितीत हे पॅकेज जगामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आदर्श निर्माण करणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.
सत्तेत दुसऱ्यांदा आलेल्या मोदी सरकारने वर्षपूर्ती केली असताना पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आत्मनिर्भर पॅकेज हे प्रत्येक भारतीयाला समृद्ध होण्यासाठी नव्या युगाच्या संधी देणारे असल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये शेतकरी, कामगार, लहान उद्योजक आणि स्टार्टअपशीसंबंधित तरुण असणार आहेत.
हेही वाचा-'जीडीपीचे आकडे हे सरकारच्या चुकीच्या आर्थिक व्यवस्थापनाचे समालोचन'
भारतासह विविध देशांच्या अर्थव्यवस्था कशी सुधारणार? यावर खूप चर्चा होत आहे. याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले, की आपण आर्थिक चालना देण्यातही उदाहरण घालून देऊ, असा विश्वास आहे. देशातील 130 कोटी लोक जगाला आश्चर्यचकित तर करणार आहेतच; पण त्याचबरोबर त्यांना प्रेरणाही देतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
आपण आत्मनिर्भर होण्याची वेळ आहे. स्वत:च्या क्षमतेने आपण पुढे जायला हवे. हा केवळ आत्मनिर्भर होण्याचा मार्ग आहे. पत्रात त्यांनी विविध लाभार्थ्यांना दिलेल्या मदतीची माहिती दिली आहे.
हेही वाचा-सिटी बँकेला आरबीआयचा दणका; नियमपालनात कुचराई केल्याने ४ कोटींचा दंड
राष्ट्रहितासाठी घेतलेले ऐतिहासिक निर्णय आणि कृतीची सविस्तर माहिती देणे शक्य नाही. मात्र, प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक दिवशी माझे सरकार उत्साहात काम करत आहे. निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे रोजी नागरिकांना संबोधित करताना २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज घोषित केले होते.