नवी दिल्ली - मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे देशातील मनुष्यबळाचे दर आणि इतर खर्च कमी झाले आहेत. हीच गुंतवणूक करण्याची योग्य वेळ असल्याचे मत देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी केले. गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते फिक्कीच्या कार्यक्रमात बोलत होते.
कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था ही चक्रीय पद्धतीतून जात आहे. या चक्रीय गतीला चालना देण्यासाठी गुंतवणूक हे महत्त्वाचे साधन आहे. गुंतवणुकीने उत्पादकता व नोकऱ्यांची अर्थव्यवस्थेत निर्मिती होते. आर्थिक वर्ष २००८-०९ मध्ये देशात गुंतवणुकीचा दर हा जीडीपीच्या सुमारे ४० टक्के होता. हा गुंतवणुकीचा दर विविध कारणांमुळे कमी झाला आहे. यामध्ये बुडीत कर्ज (एनपीए) आणि कॉर्पोरेटने क्षमतेहून अधिक उत्पादकता तयार करणे अशा बाबींचा समावेश आहे.
मागणी घटल्याने मंदावलेली अर्थव्यवस्था हा कमी कालावधीचा परिणाम आहे. तर गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळासाठी चांगला परिणाम होणार असल्याचे त्यांनी म्हटले. गुंतवणूक करून इतर कंपन्यांसाठी उदाहरण दाखवून देण्याची मोठ्या कॉर्पोरेटवर दुहेरी जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.