मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँक १० हजार कोटी रुपयांच्या सरकारी रोख्यांची खरेदी आणि तेवढीच विक्री करणार आहे. ही विक्री खुल्या मार्केट ऑपरेशन्समधून (ओएमओ) १० सप्टेंबरला करण्यात येणार आहे.
आरबीआयकडून ३१ ऑगस्टला विशेष प्रोत्साहन म्हणून एकाच वेळी सरकारी रोख्यांची खरेदी आणि विक्री होणार आहे. ही एकूण २० हजार कोटींची खरेदी आणि विक्री दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्प्यातील लिलाव हा १० सप्टेंबला होणार असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.
हेही वाचा-'भारताच्या जीडीपीतील घसरण ही प्रत्येकासाठी धोक्याची घंटा'
तीन प्रकारच्या रोख्यांची खरेदी आणि विक्री करण्यात येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. विक्रीच्या दिवशीच लिलाव जाहीर करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील लिलाव १७ सप्टेंबरला करण्यात येणार आहेत.
हेही वाचा-पर्यटन क्षेत्रासाठी सरकारने तत्काळ मदत करावी; आयएटीओची मागणी
एकाच वेळी सरकारी रोख्यांची खरेदी आणि विक्री करण्यात येणारा हा व्यवहार ऑपरेशन ट्विस्ट म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये दीर्घकाळ मुदतीचे सरकारी रोख्यांची खरेदी करण्यात येते. तर तेवढ्याच किमतीच्या कमी कालावधीचे सरकारी रोखे विक्री करण्यात येतात.