नवी दिल्ली - आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळात भारतीय बँकिंग क्षेत्राची अत्यंत वाईट स्थिती होती, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना राजन यांनी एकूण दोन तृतीयांश काळात भाजपची सत्ता असताना आरबीआयचे गव्हर्नरपद भूषविले होते, याची भाजपला आठवण करून दिली.
निर्मला सीतारामन यांनी नुकतेच आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन व माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर टीका केली होती. यावर रघुराम राजन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी केवळ ८ महिने काँग्रेसच्या कार्यकाळात होतो. तर भाजपच्या कार्यकाळात २५ महिने आरबीआयचा गव्हर्नर होतो. आपल्या कार्यकाळात अधिकतर भाजपची सत्ता होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपल्याला राजकीय वादात अडकायचे नाही, असेही त्यांनी मुलाखतीत म्हटले.
पुढे ते म्हणाले, आम्ही कारभारामधील स्वच्छता सुरू केली. ते काम सुरू आहे. ते लवकर पूर्ण होण्याची गरज आहे. (आरबीआयचे) पुनर्भांडवलीकरण झाले आहे. बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रातही सुधारणा करण्याची गरज आहे.
हेही वाचा-सीएआयटीचे अॅमेझॉनसह फ्लिपकार्ट कंपनीविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
२०१६ मध्ये पहिल्या तिमाहीत विकासदर हा ९ टक्के होता. तर चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत विकासदर हा ५ टक्के होता. मला वाटते, ५ टक्के (विकासदर) हा बराचसा वाईट आहे. त्यामुळे तुम्हाला काहीतरी करावे लागणार आहे. ५ टक्के विकासदर असल्याने नोकऱ्या मिळत नाहीत. दर महिन्याला १ कोटी १० लाख मनुष्यबळाची भर पडत आहे.
सरकारकडे सुधारणा हाती घेण्यासाठी राजकीय सामर्थ्य आहे, ही चांगली बातमी आहे. मात्र त्यासाठी तसे करण्यात आले नाही, ही वाईट बातमी आहे. राजन यांनी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून ५ सप्टेंबर २०१३ ते सप्टेंबर २०१६ पर्यंत काम पाहिले आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नव्या पिढीतील सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.