हैदराबाद - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मल्टीमोड पद्धतीने ऑनलाईन शिक्षण देण्याची घोषणा केली. यामध्ये प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र प्रसारणवाहिनी असणार आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या, की पीएम ई-विद्या अभियानातून ई-शिक्षणाची सुरुवात करण्यात येणार आहे. टॉप १०० विद्यापीठांना ऑनलाईन शैक्षणिक कोर्स सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे कोर्स ३० मे २०२० पासून सुरू होणार आहेत. विद्यार्थी, शिक्षण आणि कुटुंबांसाठी मनोदर्पण हा मानसिक आरोग्यासाठी उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यामधून भावनिक स्थिती चांगली राहणे, हादेखील उद्देश आहे.
शिशूगट आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अध्ययानाचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम लवकरच लाँच करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेट नाही, त्यांच्यासाठी स्वयमप्रभा डीटीएच प्रसारणवाहिनी आहे. त्यामधील तीन प्रसारणवाहिन्या या शालेय शिक्षणासाठी आहेत. तर उर्वरित १२ प्रसारणवाहिन्या लवकरच सुरू होणार आहेत. दिक्षा या प्लॅटफॉर्मला २४ मार्चपासून ६१ कोटी हिट्स मिळाल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
हेही वाचा-आत्मनिर्भर पॅकेज : कर्ज मर्यादा वाढविल्याने राज्यांना ४.२८ लाख कोटी मिळणार - केंद्रीय अर्थमंत्री
- दिक्षामधून क्युआर कोड असलेले पुस्तके राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत.
- कम्युनिटी आणि रेडिओचा वापरही शिक्षणासाठी करण्यात येणार आहे.
- दिव्यांगांनाही ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी सुविधा देण्यात येणार आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे शाळा व महाविद्यालयांचे शैक्षणिक वेळापत्रक विस्कळित झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये, यासाठी डिजीटल शिक्षणाचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात येत आहे.
हेही वाचा-आर्थिक पॅकेज : मनरेगाकरता अतिरिक्त ४० हजार कोटींची तरतूद