नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना महागाई व मंदीबाबत (स्टॅगफ्लॅशन) विचारले असता कोणतीही टिप्पणी देण्यास (नो कॉमेंट) नकार दिला. स्टॅगफ्लॅशन म्हटले जात आहे, मात्र त्याबाबत मी काहीही प्रतिक्रिया देणार नाही, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.
देशाची अर्थव्यवस्था चलन फुगवटा व मंदीच्या स्थितीत जात आहे, असा प्रश्न माध्यमांनी निर्मला सीतारामन यांना विचारला. त्यावर सीतारामन म्हणाल्या, जिथे अर्थव्यवस्था आहे, त्याबाबत चर्चा करण्याची इच्छा नाही. त्यामध्ये मला सुधारणा करणाऱ्या गोष्टीवर काम करण्यात रस आहे.
हेही वाचा-बीपीसीएलचे खासगीकरण: 'या' देशांत सरकार करणार रोड शो
असे आहे आर्थिक तज्ज्ञांचे मत-
- जोखीम वाढत असल्याने भारताने त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, असे मत नुकतेच माजी पंतप्रधान तथा अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले होते.
- सध्याची महागाई ही केवळ अन्नाच्या किंमती वाढल्याने झाल्याचे मत राष्ट्रीय सार्वजनिक वित्त आणि धोरण संस्थेचे प्रा. एन. आर. भानूमुर्ती यांनी व्यक्त केले.
- माजी मुख्य सांख्यिकीतज्ज्ञ प्रणव सेन म्हणाले, ही महागाई तात्पुरत्या काळासाठी आहे. याला मी चलनफुगवटा व मंदीच्या स्थितीत (स्टॅगफ्लॅशन) म्हणणार नाही. महत्त्वाच्या वस्तुंची महागाई कमी आहे, ही बाब सेन यांनी अधोरेखित केली.
- कृषी क्षेत्र वगळता महागाई कमी झाली आहे. हे महागाईचे आकडे अपेक्षित नव्हते, असे क्रिसिल या पतमानांकन संस्थेचे मुख्य अर्थतज्ज्ञ डी. के. जोशी यांनी म्हटले. तुम्हाला बाजारात गेल्यावर भाजीपाल्यांच्या किमती खूप वाढल्याचे दिसेल. महागाई वाढण्याचे हे प्रमुख कारण आहे, असे जोशी यांनी सांगितले.
काय आहे चलनफुगवटा आणि मंदीची अवस्था? (स्टॅगफ्लॅशन)
अर्थव्यवस्थेत जेव्हा सतत विकासदर घसरतो, तेव्हा बेरोजगारी आणि महागाईत एकाचवेळी वाढ होते. तेव्हा स्टॅगफ्लॅशन म्हटले जाते. एकाचवेळी महागाई आणि बेरोजगारी वाढल्याने आर्थिक उत्पादकतेमध्ये घट होते. या संज्ञेचा सर्वप्रथम इंग्लंडच्या संसदेत १९६५ मध्ये वापर करण्यात आला होता.
हेही वाचा-चिंताजनक! 'मूडीज'ने घटविला देशाच्या जीडीपीचा अंदाजित विकासदर
माझे कार्यालय सोडून सगळीकडे जीएसटीचे दर वाढविण्याची चर्चा - सीतारामन
कर संकलन कमी झाल्याने जीएसटीचे दर वाढण्यात येतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यावर बोलताना सीतारामन म्हणाल्या, आगामी जीएसटी (वस्तू व सेवा कर) परिषदेच्या बैठकीत जीएसटीचे दर वाढण्यात येतील, अशी सर्वत्र चर्चा आहे. फक्त ही चर्चा माझ्या कार्यालयात नाही. जीएसटीचे दर वाढविण्याबाबत चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारी आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये किरकोळ बाजारपेठेतील महागाईचा दर ५.५४ टक्के झाला आहे. हा गेल्या तीन वर्षातील महागाईचा सर्वाधिक उच्चांक आहे.