नवी दिल्ली - वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची आज ४२वी बैठक सकाळी ११ वाजता सुरू झाली आहे. या बैठकीचे अध्यक्षपद जीएसटी समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भूषवित आहेत.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या परिषदेस केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री हे जीएसटी उपस्थित आहेत, ही माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने ट्विटरवरून दिली आहे. मागील २७ ऑगस्टच्या परिषदेत जीएसटी समितीने राज्यांना जीएसटी मोबदला घेण्यासाठी कर्ज घेण्याचे दोन पर्याय सूचविले आहेत. यामध्ये पहिला पर्याय भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विशेष खिडकीतून वाजवी व्याजदरात ९७ हजार कोटींचे कर्ज घेणे आहे. तर दुसऱ्या पर्यायानुसार राज्यासह केंद्रशासित प्रदेशातून बाजारातून कर्ज घेता येणार आहे.
कोरोना महामारीत राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांचे कर संकलन घटले आहे. भाजपाची सत्ता नसलेल्या बहुतांश राज्यांनी केंद्र सरकारच्या कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला नकार दिला आहे.