नवी दिल्ली - मूडीज या गुंतवणूकदारांना सेवा देणाऱ्या कंपनीने देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नात (जीडीपी) आणखी घट होणार असल्याचा अंदाज केला आहे. मूडीजने जीडीपी पूर्वीचा ६.२ टक्क्यांचा अंदाज बदलून ५.८ टक्के हा नवा अंदाज वर्तविला आहे. अर्थव्यवस्थेला मंदावलेल्या स्थितीचा स्पष्ट अनुभव येत असल्याचेही मूडीजने म्हटले आहे.
नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात जीडीपी ६.१ टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याहून कमी म्हणजे ५.८ टक्के जीडीपी राहिल, असे मूडीजने म्हटले आहे. कमी झालेल्या गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्था मंदावल्याचे मूडीजने म्हटले आहे. त्याचा परिणाम उपभोगतेवर (कन्झम्पशन) झाला आहे. तसेच ग्रामीण भागातील आर्थिक तणाव आणि कमी रोजगार निर्मिती झाली आहे.
हेही वाचा-सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये कमालीची घट; खासगी नोकऱ्यांमध्ये ९.२ टक्क्यांची वाढ
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीडीपी हा ६.६ टक्के राहील, अशी अपेक्षा मूडीजने व्यक्त केली. तसेच येत्या दोन वर्षात वास्तविक राष्ट्रीय सकल उत्पन्न आणि महागाई सुधारेल, अशी अपेक्षा केली आहे.
हेही वाचा-सरकारचा पीएमसीमध्ये थेट हस्तक्षेप नाही - निर्मला सीतारामन
काय म्हटले आहे मूडीजने -
- जागतिक मानांकनानुसार ५ टक्के जीडीपीचा विकासदर हा तुलनेने जास्त आहे. मात्र भारतासाठी हे प्रमाण खूप कमी आहे.
- भारतामधील खासगी क्षेत्रातील गुंतणूक २०१२ पासून कमी राहिली आहे.
- कॉर्पोरेट करात कपात केल्याने सरकारचे १.४५ लाख कोटींचे महसुली उत्पन्न बुडणार आहे. हे बुडालेले उत्पन्न जीडीपीच्या ०.७ टक्के एवढे आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात आरबीआयने चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा अंदाज ६.९ टक्क्यांवरून ६.१ टक्के राहिल, असे पतधोरण आढाव्यात म्हटले होते.