नवी दिल्ली - केंद्र सरकारने २०२५ पर्यंत ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र प्रत्यक्षात औद्योगिक विकास घसरत आहे. औद्योगिक उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक घसरल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसून आले. खाण व उत्पादन क्षेत्राची सुमार कामगिरी झाल्याने औद्योगिक उत्पादन क्षेत्रात घसरण झाली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक ३.१ टक्के नोंदविण्यात आला आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) हा मे २०१८ मध्ये ३.८ टक्के होता. चालू वर्षात एप्रिलमध्ये ४.३ टक्के आयआयपी होता. तर मार्चमध्ये ०.४ टक्के होता. खाण क्षेत्राचा विस्तार (एक्सपांड) मे महिन्यात ३.२ टक्के होता. तर गतवर्षी मे महिन्यात ५.८ टक्के खाण क्षेत्राचा विस्तार होता. मे महिन्यात तर उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक हा मे महिन्यात २.५ टक्के होता. गतवर्षी मे महिन्यात उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक हा ३.६ टक्के होता.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार जूनमध्ये भांडवली वस्तुंचे उत्पादन हे ०.८ टक्के आहे. भांडवली वस्तू या गुंतवणुकीच्या बॅरोमीटर (वातावरणाचा दबाव मोजण्याचे साधन) म्हणून दर्शविल्या जातात. गतवर्षी भांडवली वस्तुंचे उत्पादन हे ६.४ टक्के होते. वापराच्या वर्गवारीनुसार प्राथमिक वस्तुंचा वृद्धी दर हा मे २०१९ मध्ये २.५ टक्के होता. तर गेल्या वर्षी याच काळात प्राथमिक वस्तुंचा वृद्धी दर तेवढाच होता.
उद्योगातील २३ औद्योगिक गटापैकी १२ औद्योगिक गटामध्ये सकारात्मक वृद्धी झाली आहे. गतवर्षी मे महिन्यात अशीच सकारात्मक वृद्धी झाल्याचे दिसून आले होते.
स्ट्रॉ आणि प्लेटिंग उत्पादनांचा सर्वात अधिक म्हणजे २४.८ टक्के वृद्धी दर झाला. कागद आणि कागदजन्य उत्पादनांचा वृद्धीदर सर्वात कमी म्हणे उणे १२.२ टक्के झाला आहे.