मुंबई - शेअर बाजारात सुमारे २,९०० अंशांनी घसरण झाल्याने दलाल स्ट्रीटवर निराशाजनक वातावरण आहे. तर दुसरीकडे देशात मंदी येण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबई शेअर बंद होताना निर्देशांक २,९१९.२६ अंशांनी घसरून ३२,७७८.१४ वर स्थिरावला. ही २००८ नंतर शेअर बाजारातील आजपर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे.
मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीलाही घसरणीचा मोठा फटका बसला आहे. निफ्टीचा निर्देशांक ८६८.२५ अंशांनी घसरून ९,५९० वर स्थिरावला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारी घोषित केल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात पडझड झाली आहे. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याचे देशातील आणि जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अशा स्थितीत सरकारने हस्तक्षेप करावा आणि मदत करावी, अशी मागणी होत आहे.
शेअर बाजारात आजपर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या ५ घसरणी
दिनांक | घसरण (अंश) |
१२ मार्च २०२० | २,९१९.२६ |
९ मार्च २०२० | १,९४१.६७ |
२४ ऑगस्ट २०१५ | १,६२४.५१ |
२८ फेब्रुवारी २०२० | १,४४८.३७ |
२१ फेब्रुवारी २००८ | १,४०८.३५ |
संबंधित बातमी वाचा-'महामारी'चा द'लाल'स्ट्रीटला दणका; शेअर बाजारात २,९१९ अंशांनी पडझड
अमेरिकेसह अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कमी केले आहेत. कोविड-१९ चे जगभरातील रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
संबंधित बातमी वाचा-कोरोनाने देशातील विविध उद्योगांना उतरती 'कळा'
खनिज तेलाचे दर जागतिक बाजारपेठेत घसरून प्रति बॅरल ३४ डॉलर झाले आहेत. गेल्या सतरा महिन्यांत रुपयाची सर्वाधिक घसरण होवून प्रति डॉलर ७४.३४ रुपये किंमत झाली आहे.