नवी दिल्ली - अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी उद्या संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एकदिवस आधी हा अहवाल संसंदेत मांडला जातो. हा सर्वेक्षण अहवाल संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांपुढे मांडला जाईल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करणार आहेत.
काय असतो आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल?
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्याची स्थिती कशी आहे, याची माहिती आर्थिक पाहणी अहवालामधून (आर्थिक सर्व्हे) दिसून येत असते. हा अहवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेमध्ये सादर करणार आहेत. या अहवालात सरकारचे आर्थिक प्रगतीचे उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी शिफारशी असणार आहेत. आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीवरुनच अर्थसंकल्प तयार करण्यात येतो. या सर्व्हेत केलेल्या शिफारसीचे प्रतिबिंब उद्याच्या केंद्रीय अर्थसंकल्पात दिसण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेचा घटलेला विकासदर, रोजगार निर्मितीचे कमी झालेले प्रमाण आणि मागणी वाढण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना देणे यावर आर्थिक सर्व्हेमध्ये शिफारशी असण्याची शक्यता आहे. आर्थिक सर्व्हेमध्ये वर्षभरातील विविध योजनांच्या अंमलबजावणी आणि आर्थिक प्रगतीची आकडेवारी असण्याची शक्यता आहे.