नवी दिल्ली - करांचे संकलन कमी होत असतानाच जीएसटी परिषदेची बैठक 12 जूनला होणार आहे. कोरोना महामारीच्या संकटात जीएसटी परिषदेची ही पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीत कोरोनाच्या संकटाचा करसंकलनावर झालेल्या परिणामांबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
देशभरात 25 मार्चपासून टाळे बंदी लागू केली असल्याने करसंकलनावर मोठा परिणाम झाला आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) परिषदेचे अध्यक्ष हे केंद्रीय अर्थमंत्री आहेत. या परिषदेचे सदस्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार जीएसटी परिषदेची बैठक 12 जूनला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. जीएसटी परिषदेची 39 वी परिषद ही मार्चमध्ये झाली होती. त्या परिषदेमध्ये कोरोनाच्या संकटाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम काय असू शकतो, यावर चर्चा करण्यात आली होती. त्यावेळेस देशातील कोरोना रुग्णांची संख्याही कमी होती. तसेच टाळेबंदीची घोषणाही करण्यात आली नव्हती.