नवी दिल्ली - टाळेबंदीचे नियम काढले तरी देशातील औद्योगिक उत्पादनात सुधारणा झाली नाही. औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये १०.४ टक्क्यांची घसरण झाली आहे. उत्पादन क्षेत्र, खाणी आणि वीज निर्मितीचे प्रमाण घसरल्याने औद्योगिक उत्पादनात घसरण झाली आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (आयआयपी) आकडेवारीनुसार उत्पादन क्षेत्रात ऑगस्टमध्ये ११.१ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर खाणींमधील उत्पादनात १३ टक्क्यांची व वीजनिर्मितीत २.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून देशभरात मार्च २०२० टाळेबंदी जाहीर केली होती. तेव्हापासून औद्योगिक क्षेत्रातील अनेक आस्थापना सुरू झाल्या नसल्याचे केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी कार्यक्रम विभागाने म्हटले आहे. टाळेबंदीचे नियम शिथील केल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात चलनवलन सुरू होत असल्याचेही विभागाने म्हटले आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांक जुलैमध्ये ११८.१ टक्के राहिला आहे. तर एप्रिलमध्ये ५४.०, मे महिन्यात ८९.५ तर जूनध्ये १०८.९ औद्योगिक उत्पादन निर्देशांक होता. कोरोनाच्या काळात दर महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांक सावरत आहे.
दरम्यान, पुणे परिसरातील औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये ५० टक्क्यांची घसरण झाल्याचे एमसीसीआयएच्या अहवालामधून समोर आले आहे.