वॉशिंग्टन - देशाच्या सकल उत्पादनात (जीडीपी) चालू आर्थिक वर्षात ९.६ टक्क्यांची घसरण होईल, असा जागतिक बँकेने अंदाज व्यक्त केला आहे. कोरोना महामारीत देशभरात लागू केलेली टाळेबंदी आणि उत्पन्न कमी झाल्याचा कुटुंबांसह कंपन्यांना धक्का बसला आहे. भारताची अर्थव्यवस्था कधी नव्हे अशी अत्यंत वाईट झाल्याचे जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे.
जागतिक बँकेची व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीपूर्वी दक्षिण आशियाच्या आर्थिकबाबींवर प्रकाश टाकणारा अहवाल जागतिक बँकेने प्रसिद्ध केला आहे. दक्षिण आशियाच्या अर्थव्यवस्थेवर अपेक्षेहून अधिक परिणाम होणार असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. दक्षिण आशियाचा विकासदर हा ७.७ टक्के घसरेल, असा अहवालात अंदाज केला आहे.
दक्षिण आशियाकरता नियुक्ती असलेल्या जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ हंस टिम्मर म्हणाले, की भारतात कधी नव्हे तेवढी अत्यंत वाईट स्थिती आहे. ही देशातील अत्यंत अपवादात्मक स्थिती आहे.
दरम्यान, चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत पहिल्या तिमाहीच्या तुलनेत २५ टक्के जीडीपीत घसरण झाली आहे. कोरोना महामारी आणि संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना केल्याने देशातील पुरवठा आणि मागणी साखळी मोठ्या प्रमाणात विस्कळित झाल्याचे जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे.