नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्था कुंठित अवस्थेत असून बाजारातील मागणी रोडावली आहे. नव्याने रोजगारही तयार होत नाही. मात्र, भारतीय जनता पक्ष अर्थव्यवस्थेची ही अवस्था नाकारत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसच्या मुख्यालयात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी भाजपवर टीका केली.
२०२० वर्षात अर्थव्यवस्थेत काही नवे घडण्याची आशा नाही. कारण, जीडीपी ६ टक्क्यांच्याही खाली घसरला आहे. भाववाढ साडेसात टक्क्यांवर पोहचली आहे. देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या खोल गर्तेत अडकलेली असताना २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडला जात आहे, त्यामुळे आता नुसत्या पोकळ गप्पा मारण्याचा काळ संपल्याचे श्रीनाते म्हणाल्या.
भाववाढ, नोकऱ्यांतील मंदी आणि बाजारातील रोडावलेल्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आली आहे. अशा परिस्थीतीत भाववाढ आणखी होण्याची शक्यता आहे. देशात गुंतवणूक वाढत नसल्याने त्याचा नोकऱ्यांवर परिणाम होईल, मागील पाच वर्षात अर्थव्यवस्थेतील सात महत्त्वाच्या क्षेत्रातील तीन कोटी चाळीस लाख लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे, असेही त्या म्हणाल्या.
ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होईल. अर्थव्यवस्थेच्या मंदीचे हे दृष्टचक्र सर्वांची काळजी वाढवणारे आहे. मात्र, सरकार अर्थव्यवस्थेची वाईट परिस्थिती नाकारत राहिल्याने आधी फक्त बाजारातील मागणी कमी होती, पण आता पुरवठाही कमी झाला आहे, अशा प्रकारे दुहेरी संकट भारतीय अर्थव्यवस्था झेलू शकणार नाही, असे श्रीनाते म्हणाल्या.
मागील २० वर्षात पहिल्यांदाच अप्रत्यक्ष कराद्वारे जमा होणाऱ्या महसूलात घट झाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आली आहे. रोजगार आणि उत्पन्न कमी होण्याचे हे लक्षण आहे. मार्च महिन्यापर्यंत साडेचार टक्के महसूली तूट होण्याची शक्यता आहे. ५ टक्क्यांपेक्षाही कमी दराने अर्थव्यवस्थेची वाढत असल्याने तूट आणखी वाढेल, असे त्या म्हणाल्या.
आर्थिक मानांकन कंपन्यांनी आर्थिक शिस्त पाळण्यासंबधी अनेक वेळा इशारे दिले आहेत. भारतात केलेली कोट्यवधीची गुंतवणूक माघारी जाईल, असे तज्ज्ञांचेही मत आहे. भागधारकांना नफा न मिळाल्याने ते गुंतवणूक देशातून काढून घेतील, वाढत्या महसूली तूटीमुळे भाववाढही मोठ्या प्रमाणात वाढेल. मागील सहा वर्षात भाजप सरकराच्या अर्थसंकल्पाचे मूल्य ढासळत असल्याचे श्रीनाते म्हणाल्या.
देशाच्या योजनांमधील निश्चिततेला गुंतवणूकदार पसंती देतात. अर्थसंकल्पामध्ये मध्यम आणि दिर्घ काळाचे नियोजन असावे, फक्त अडचींवर पांघरून घालण्याचा प्रयत्न नसावा, असे श्रीनात म्हणाल्या.