बीजिंग - भारत-चीनमधील व्यापारी तूट ५ हजार ८०० कोटी डॉलरपर्यंत पोहोचल्याने भारताने चिंता व्यक्त केली आहे. वित्तीय तूट कमी करण्याला सर्वात अधिक प्राधान्य देऊ, असे चीनमधील भारताचे नवे राजदूत विक्रम मिस्त्री यांनी स्पष्ट केले.
चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्त्री यांनी ८ जानेवारीला प्रभार घेतला आहे. चीनची बाजारपेठ भारतीय कृषी उत्पादनांना अधिक खुली होण्यासाठी भारताचा प्रयत्न असल्याचे मिस्त्री यांनी चीनचे सरकारी माध्यम ग्लोबल टाईम्सला सांगितले. चालू वर्षात दोन्ही देशातील व्यवसाय १० हजार कोटी डॉलरपर्यंत पोहोचेल अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली. यामध्ये वित्तीय तूट ५ हजार ८०० कोटींची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारत-चीनमधील वित्तीय तूट दरवर्षी वाढत आहे. साखर, तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारची फळे, पालेभाज्या, औषधे यांच्यासाठी चीनची बाजारपेठ भारताला खुली हवी आहे. यामध्ये काही प्रमाणात प्रगती होत आहे. मात्र, प्रत्यक्षात भारताच्या निर्यातीचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. याबाबत चीनकडून आम्हाला सहकार्य अपेक्षित असल्याचे मिस्त्री यांनी सांगितले. आयटी उत्पादने, सेवा आणि औषधी उत्पादने यांच्यासाठी चीनमधील बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी अडथळे दूर करण्याबाबत प्रयत्न करण्याची गरज मिस्त्रींनी व्यक्त केली. हॉस्पिटिलीटी, रेस्टॉरंट हे क्षेत्रदेखील खुले करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शिओमीसारख्या स्मार्टफोन कंपन्या देशात चांगले व्यवसाय करत आहेत. त्यांनी भारतात उत्पादन प्रकल्प सुरू केले असल्याने त्यांचे स्वागत करत असल्याचे मिस्त्रींनी ग्लोबल टाईम्स सांगितले. रेल्वे, रस्ते अशा पायाभूत क्षेत्रात तसेच औद्योगिक पार्क, अन्न प्रक्रिया उद्योगात चीनकडून गुंतवणुकीची अपेक्षा आहे. दोन्ही देशातील संस्कृतीची आदानप्रदान करण्याची गरज त्यांनी अधोरेखित व्यक्त केली.
चिनी पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली. चीन आणि भारत हे वेगाने विकसित होणारे देश आहेत. दोन्ही देश समान प्रादेशिक समस्यांना तोंड देत आहेत. यामध्ये उर्जा समस्या, हवामानातील बदल, दहशतवाद आणि आतंरराष्ट्रीय व्यापाराची पद्धत अशा समस्या आहेत.